पुणे: वाघोली येथील दहा एकर जमीन प्रकरणात चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लांडगे, सह दुय्यम निबंधक यांच्यासह तब्बल 16 जणांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अपर्णा यशपाल वर्मा (वय 58, रा. अंधेरी, मुंबई) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लांडगे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. (Latest Pune News)
आरोपींनी फिर्यादी अपर्णा वर्मा यांच्या नावे दुसरी महिला उभी करून त्यांची जमीन बळकाविण्यासाठी कट रचला. त्यांच्या नावाने बनावट दस्त तयार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल आहे. लांडगे आणि इतर आरोपींनी बनावट खरेदीखत करून ते खरे असल्याचे भासवले.
मिळकत साठेखतसह दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत करून जमीन बळाकाविण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, नोयल जोसेफ दास, नोअल जोसेफ दास, ज्योती नोयल दास, राहुल नोयल दास, रोशनी नोयल दास, जॉक्सन नोयल दास, रोहित जॉक्सन दास, गिरीश रामचंद्र कामठे, हेमंत कामठे, संतोष शेट्टी, अदित्य घावरे, अमोल भूमकर, राजेंद्र लांडगे, रामेश्वर बळीराम मस्के, सहदुय्यम निबंधक कार्यालयातील एक जण, तसेच सह दुय्यम निबंधक येथील दस्त नोंदणी करणारे निबंधक अशा 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024 ते 23 जानेवारी 2025 या कालावधीत ही घटना घडली. वाघोली येथील एकाच जमिनीवर चार अपर्णा वर्मा यांनी दावा केला आहे. वेगवेगळ्या लोकांशी संगनमत करून चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी खरेदीखत करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर लांडगे आणि इतरांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाची व्याप्ती विचारात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. ही मिळकत साठेखतासह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदणीकृत करुन मुंबई येथील अपर्णा वर्मा यांची जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक डांगे अधिक तपास करीत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले.
नेमके काय आहे वाघोलीतील जमीनमालकी प्रकरण..?
वाघोली येथील 10 एकर जागेच्या मालकीवरून चार अपर्णा वर्मा समोर आल्या होत्या. त्यांनी आपणच जमिनीच्या खर्या मालक असल्याचा दावा केला होता. त्यातील नगर, इस्लामपूर आणि राजस्थानमधील अपर्णा वर्मा या बनावट असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले असून, त्यांनी न्यायालयात दाखल केलेले दावे मागे घेतले आहेत.
मुंबई येथील अपर्णा वर्मा या पुण्यात असताना जमीन खरेदी केली होती. त्यानंतर त्या दुबईला गेल्या होत्या. मात्र याच अपर्णा वर्मांविरोधात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून राजेंद्र लांडगे आणि साथीदारांनी साडेसहा कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.