गार्ड्सना 26 ऐवजी 40 दिवसांचे वेतन; अधिकार्‍यांच्या वादातून महापालिकेतील आणखी एक भ्रष्टाचार उघड  pudhari
पुणे

Pune: गार्ड्सना 26 ऐवजी 40 दिवसांचे वेतन; अधिकार्‍यांच्या वादातून महापालिकेतील आणखी एक भ्रष्टाचार उघड

मलई खाणार्‍या ‘त्या’ अधिकार्‍याचा शोध घेणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुंबईतील 200 सुरक्षा कर्मचार्‍यांचा पगार पालिका प्रशासनाकडून दिल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता. त्यानंतर आता सुरक्षा मंडळाकडील जवानांनी 26 दिवस काम केले असताना त्यांचा 40 दिवसांचा पगार काढला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा भ्रष्टाचारचा प्रकार दोन अधिकार्‍यांच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे महापालिकेत खळबळ उडाली असून, ’त्या’ भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई होणार का ? हा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागात महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडील सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यावरून महापालिकेचे सुरक्षा अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामध्ये वाद झाला आहे. (Latest Pune News)

अतिक्रमण विभागाकडील कार्यकारी अभियंता सदानंद लिटके यांनी शुक्रवारी सकाळी सुरक्षा अधिकारी राकेश वीटकर यांच्याशी संपर्क साधत अतिक्रमण कारवाईच्या बंदोबस्तासाठी वर्षभरापूर्वी नेमलेल्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडील 33 सुरक्षारक्षकांना तातडीने कार्यमुक्त करा, अशी मागणी केली.

मात्र, महापालिका आयुक्त कार्यालयासह विविध ठिकाणी नेमलेले हे सुरक्षारक्षक कार्यमुक्त करण्यासाठी थोडा काळ लागेल, असे सुरक्षा अधिकारी वीटकर यांनी सांगितले. मात्र, यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून अगदी हाणामारीदेखील झाली. दरम्यान, अतिक्रमण विभागाने या सुरक्षारक्षकांचे गेल्या 2 महिन्यांचे वेतन थकवले असल्याचेदेखील समोर आले.

दरम्यान, दोघेही अधिकारी सुरक्षा विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या कार्यालयात गेले. या वेळी लिटके, वीटकर व बनकर यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून एकमेकांना शिवीगाळ करत हाणामारी केल्याचा प्रकारदेखील घडला.

बनकर यांनी शिवीगाळ करून माझा मोबाईल फेकून देत फोडला, असा आरोप लिटके यांनी केला. तर लिटके यांनी मला शिवीगाळ करत अंगावर धावून येत मारहाण केल्याचे सांगितले आणि आपल्या हातावरील ओरबडल्याच्या खुणा दाखवत हा प्रकार बनकर यांनी केल्याचे सांगितले. याप्रकरणी लिटके यांनी आयुक्तांना निवेदन देत माहिती दिली, तसेच याबाबत अभियंत्यांच्या ग्रुपवरही ही माहिती टाकली.

या वेळी आपली भूमिका मांडताना बनकर म्हणाले, ’ लिटके यांनी सुरक्षा मंडळांकडील रक्षक नेमताना कुठलीही निविदा काढलेली नसल्याचे समोर आले, तर कराराचे डिपॉझिटदेखील त्यांनी भरलेले नाही. महिन्यातील 26 दिवस काम करणे अपेक्षित असताना या कर्मचार्‍यांची 40 दिवसांची हजेरी लावण्यात आली आहे. असे चुकीचे बिल काढण्यास मी विरोध केल्याने मला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली.’

या सुरक्षारक्षकांची नेमणूक माझ्या अगोदरच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनी केली होती. अतिक्रमण विभागात नेमणुकीला असताना इतर कनिष्ठ अधिकार्‍यांकडून बिल तपासून माझ्याकडे येत असल्याने मी दोन ते तीन महिने बिलांवर स्वाक्षर्‍या केल्या असतील.

त्या काळात बिल काढणारा अधिकारी वेगळा होता. लिटके हे नव्यानेच अतिक्रमण विभागात आले असून, सुरक्षा मंडळाकडील रक्षकांचे 40 दिवसांचे वेतन काढले जात असल्याचे शुक्रवारी समोर आले. त्यामुळे या गैरप्रकाराची वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे बनकर यांनी सांगितले.

आयुक्तांकडे करणार तक्रार

सुरक्षा मंडळाचे जवळपास 100 सुरक्षारक्षक अतिक्रमण विभागाने नेमले आहेत. त्यांचे वेतनदेखील अतिक्रमण विभागच देत असल्याने त्यांचे रखडलेले वेतन द्यावे अथवा न द्यावे याच्याशी माझ्या सुरक्षा विभागाचा काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची आयुक्तांकडे तक्रार केल्याचे बनकर यांनी संगितले.

जादा पगार काढणारे अदृश्य हात कुणाचे?

अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी केवळ 8 तास ड्यूटी करत असताना राज्य सुरक्षा मंडळाकडील रक्षकांचे 26 दिवसांऐवजी 40 दिवसांचे वेतन काढले जात आहे. मात्र ’या’ प्रकारातील अदृश्य हात मात्र, नामानिराळे राहात आहेत, याबाबत सत्ताधारी व विरोधकांनी मौन बाळगले असून याला त्यांचा पाठिंबा आहे का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

वेतन पाच बंदुकधारी सुरक्षारक्षकांचे, ड्यूटीवर मात्र एकच

ड्यूटीवर एकच बंदुकधारी रक्षक असताना वेतन मात्र पाच बंदुकधारी सुरक्षारक्षकांचे काढले जात आहे. त्यात बंदूक सांभाळण्यासाठी आणखी तीन सुरक्षारक्षक नेमल्याची माहितीदेखील समोर आल्याचे बनकर यांनी सांगितले.

देशातील सध्याच्या परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाची प्राथमिकता आहे. अधिकार्‍यांतील वाद हे आपसांत मिटवले जातील.
- डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT