Anjali Damania
पुणे : बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशी समितीत ६ पैकी ५ सदस्य पुण्यातील आहेत. ४२ कोटी देऊन व्यवहार रद्द होत नाही. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना समिती निष्पक्ष चाैकशी करू शकेल का? यामुळेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. तसेच पार्थ पवार यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
आज (दि.१२) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळ दमानिया म्हणाल्या की, कोणत्याही जमिनीचा व्यवहार रद्द करताना जागेची मालक किंवा घेणारे व्यवहार रद्द करू शकतात. पण शिवानी तेजवानी या जागेची मालक नाही, त्यामुळे गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचा अधिकार त्यांना नाही. कायद्यानुसार ही खरेदी पार्थ पवार किंवा त्यांची कंपनी देखील रद्द करू शकत नाही. त्यांच्याकडे जमीनीचेच अधिकार नाहीत. ही रद्द करायची एक प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुढे त्या म्हणाल्या, "शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबद्दल पत्र दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे सर्वात अगोदर या जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे. व्यवहार रद्द करतो म्हणणे हे चोरीचा माल परत करतो, असे म्हटल्या प्रमाणे आहे. या व्यवहारात ९९ टक्के भागिदारी पार्थ पवारांची, तर केवळ १ टक्के दिग्विजय पाटील यांची आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब गुन्हा दाखल करावा."