पुणे

अंगणवाडीताईंनो, लवकर कामावर रुजू व्हा : मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांच्या प्रश्नांबाबत संघटनांसोबत सात ते आठ बैठका झाल्या असून, अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. शासन अंगणवाडी सेविकांच्या अन्य प्रश्नाबाबत सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे, मागील सव्वा महिन्यापासून सुरू असलेला संप थांबवून सेविकांसह मदतनीसांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे, असे आवाहन महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केले.

अंगणवाडीच्या माध्यामातून राज्यातील 70 लाख बालकांसह गरजू मातांना पोषण आहाराचा लाभ देत असतो. यंदा 13 हजार अंगणवाड्यांचे रूपांतर मूळ अंगणवाडीत करण्यात आले असून, 17 हजार मदतनीसांची भरती करण्यात आली आहे. मिनी अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळाली आहे. शासन आणि विभाग सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत.
मराठा आरक्षणावर बोलताना तटकरे म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे ही सरकारचीही भूमिका आहे.

आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यादृष्टीने विचार करण्यात येत आहे. वारंवार समाजाचा भ्रमनिरास होण्यापेक्षा कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण देण्याची भूमिका शासनाची आहे. मुख्यमंत्री सातत्याने जरांगेंच्या संपर्कात आहेत. महानंदा व इतर प्रकल्पांबाबत वारंवार अफवा उठवल्या जात असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT