पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात आंदेकर टोळीतील सदस्यांनी रेकी केल्याचा प्रकार समोर आला आहे. वनराज यांचा खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह इतर आरोपींची घरे या परिसरात आहेत. त्यांच्या घरांची रेकी करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे (रा. डोके तालमीच्या मागे, गणेश पेठ) याला पकडले. त्याच्याकडे गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे जरी हा प्रकार टळला असला, तरी आंदेकर टोळीच्या रडारवर नेमके कोण होते, हे मात्र समजू शकलेले नाही. वनराज यांचा खून करणारे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत.
रविवारी (दि. 1 सप्टेंबर 2024) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वनराज यांचा टोळक्याने पिस्तुलातून गोळीबार करीत कोयत्याने वार करून खून केला होता. एकंदरीत, हा प्रकार पाहता वनराज यांच्या खुनाच्या बदल्याची आग टोळीत धुमसत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी सागर बोरगे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा आंदेकर, दत्ता बाळू काळे, यश मोहिते, अमन पठाण, यश पाटील, सुजल मिरगू, अमित पाटोळे, स्वराज वाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भारती विद्यापीठ पोलिसांना एक मुलगा सूर्या चौक आंबेगाव पठार परिसरात दोन दिवसांपासून फिरत असून, मोबाईलमध्ये फोटो काढत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, कर्मचारी सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव दत्ता काळे असून, तो डोके तालमीच्या मागे गणेश पेठेत राहण्यास असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये काळे बलात्काराच्या गुन्ह्यात कारागृहात होता. त्या वेळी त्याची स्वराज वाडेकरसोबत ओळख झाली होती. बाहेर आल्यानंतर काळे हा वाडेकरमार्फत आंदेकर टोळीच्या संपर्कात आला. त्याच परिसरात राहून तो टोळीची छोटी-मोठी कामे करीत होता. त्याला कृष्णा आंदेकर हा खर्चासाठी आणि राहण्यासाठी पैसे देत होता.
1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज यांचा खून झाला. त्यांच्या खुनाचा बदला घेण्याचा निश्चय टोळीने केला होता. गेल्या तीन महिन्यांपासून यश मोहिते हा वनराज यांच्या खुनातील आरोपींच्या घरांची रेकी करीत होता. कृष्णा याने त्यासाठी पाच हजार रुपये दिले. मोहिते याने काळे याला आंबेगाव पठार परिसरात रेकी करण्यास पाठविले.
कृष्णाला व्हॉट्सअॅपद्वारे दिली माहिती
कृष्णा आंदेकर याने खोलीसाठी पाच हजार रुपये देऊन काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठविल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेने वनराज यांचा खून करणार्या आरोपींची घरे पाहिली. त्याची माहिती त्याने कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असे सांगितले. मात्र, तो आला नाही. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी काळेने परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचे पोलिसांना दिसून आले आहे.
पाच ‘वेपन’ घेऊन पाठविले
कृष्णाने कॉल न घेतल्यामुळे काळेने यश पाटील याला कॉल केला. त्या वेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो, असे म्हटले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता कृष्णाने काळेला कॉल करून सात ते आठ जणांना पाच वेपन घेऊन पाठविले आहे, असे सांगितले. तर अमनने कॉल करून लक्ष ठेवा बाहेर आला की कळवा, असे कळविले होते. त्यामुळे आंदेकर टोळी नेमका कोणाचा गेम वाजविणार होती, याचा शोध पोलिस घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाकडे देण्यात आला आहे.