पुणे : कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या आणि मोक्का कारवाईनंतर फरार झालेल्या दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. बुधवारी (दि.8) संगमवाडी परिसरात ही कारवाई केली. अमित सुधाकर बहादुरकर (वय 36, रा. हडपसर) आणि स्वप्निल विलास बहादुरकर (वय 37, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.(Latest Pune News)
आरोपी हे आंदेकर टोळीशी संबंधित असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, अंमलदार अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, रहीम शेख यांच्यासह पथक गस्तीवर होते.
त्यादरम्यान संगमवाडी परिसरात आरोपी असल्याची माहिती पथकाला मिळाली. सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते फरार होते. सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.