Paneer Pudhari
पुणे

Analog Paneer Ban: ॲनालॉग पनीरबंदीचे दुग्ध उद्योगाकडून स्वागत; शुद्ध पनीरला मागणी, शेतकऱ्यांना चांगल्या दराची आशा

एफडीएच्या निर्णयामुळे दुग्ध व्यवसायाला बळ; कायमस्वरूपी बंदीची मागणी, दूध उत्पादकांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ॲनालॉग किंवा दुग्धविरहित पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, तयारी, पॅकिंग, साठवण, वितरणावर एक वर्षासाठी बंदी घालण्याच्या आदेशाचे दुग्ध वर्तुळातून स्वागत करण्यात येत आहे.

यामुळे दुधापासूनच्या शुद्ध पनीरला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली असून, पनीर बनविण्यासाठी दूध खरेदीस स्पर्धा निर्माण होईल. त्यातून शेतकऱ्यांनाही वाजवी दर मिळणे अपेक्षित असून, ॲनालॉग पनीरवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचीही मागणी होत आहे.

राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम मुंढे यांची मुंबई येथे भेट घेऊन ॲनालॉग पनीरवर बंदी घालण्याची मागणी केली होती. याची दखल घेतल्याने या कल्याणकारी संघाकडून निर्णयाचे स्वागत असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली. ते म्हणाले, २०० रुपये किलोने स्वस्त मिळणाऱ्या ॲनालॉग पनीरच्या उपलब्धतेमुळे त्याचा खप राहत असे.

साहजिकच डेअऱ्यांकडील दुधापासूनच्या शुद्ध पनीरला तुलनेने मागणी कमी राहत. या पनीरचा भाव सरासरी ४०० रुपये किलो आहे. आता ॲनालॉगवर बंदी घातल्यामुळे शुद्ध पनीरला मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांनाही चार पैसे जादा दर शक्य होईल. डेअरी उद्योगासाठी फायदेशीर निर्णय घेतल्याबद्दल मुंढे यांचे आम्ही अभिनंदनही करीत आहोत.

ॲनालॉग पनीर बंदीचा निर्णय एक वर्षाऐवजी कायमस्वरूपी करावा, अशी आमची अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे मागणी आहे. जे कोणी यापुढे ॲनालॉग पनीर विक्रीचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कायद्यान्वये कठोर कारवाई व्हायला हवी. तरच दुधापासूनच्या शुद्ध पनीरला ग्राहकांची मागणी आणखी वाढेल. पॅकबंद व ब्रॅण्डेड पनीरला चांगले दिवस येतील, असा हा स्वागतार्ह निर्णय आहे.
श्रीपाद चितळे, संचालक, चितळे दूध डेअरी, भिलवडी-सांगली.
अनॉलॉग पनीरवर बंदी घालून अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी दुग्ध व्यवसायाला खऱ्या अर्थाने बळकटी दिली आहे. निर्णय घेऊन त्यांनी दुधातील चुकीच्या बाबींवर कारवाईचा धडाकाही ठेवला आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा निश्चितच दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल. कारण दुधापासूनच्या शुद्ध पनीरला ग्राहकांची आणखी मागणी वाढेल. कात्रज डेअरीच्या पनीरसह दुग्धजन्य उपपदार्थांच्या मागणीत नेहमीपेक्षा आणखी वाढच झाली आहे.
अरुण चांभारे, अध्यक्ष, कात्रज दूध डेअरी
ॲनालॉग पनीरवर बंदी घालण्याच्या कल्याणकारी संघाच्या मागणीवर गांभीर्याने निर्णय घेतल्याबद्दल मुंढे यांचे आम्ही अभिनंदन करीत आहे. ग्राहकांच्या मागणीमुळे आता दुधापासूनच्या शुद्ध पनीरला मागणी वाढून शेतकऱ्यांच्या दुधाला दरही अधिक मिळेल, असा हा अत्यंत हिताचा निर्णय आहे. यापुढे ॲनालॉग पनीरच्या विक्रीला शंभर टक्‍के आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, आमदार विक्रम पाचपुते (श्रीगोंदा) यांनीही या विषयात पाठपुरावा केलेला असल्याने त्यांचेही दुग्ध उद्योग आभार मानत आहे.
प्रकाश कुतवळ, मानद सचिव, राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ/चेअरमन, ऊर्जा दूध.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT