पुणे

पिंपरी : दोन गटांच्या हाणामारीत जखमी तरुणाचा मृत्यू

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यात चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा शुक्रवारी (दि. 1) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी मृतदेह उपायुक्त कार्यालयात नेल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणावपूर्ण वातावरणात मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेश ऊर्फ कृष्णा भंडारी (रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नागम्मा मारुती भंडारी ( 40, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,

सुभाष शिंदे आणि त्याचे इतर साथीदार (नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा नरेश हा शुक्रवारी मध्यरात्री मित्रांशी गप्पा मारत होता. त्या वेळी गाड्यांच्या तोडफोडीच्या कारणावरून आरोपी सुभाष शिंदे याच्याशी त्यांचा वाद झाला. त्या वेळी आरोपी सुभाष याने नरेशच्या दिशेने सिमेंटचा गट्टू फेकून मारला. नरेश याच्या डोक्याला गट्टू लागल्याने तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला.

त्यानंतर नरेश याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री नरेश याचा मृत्यू झाला. नरेश याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. मृतदेह थेट पोलिस उपायुक्त कार्यालयात आणून इतर आरोपींना अटक करण्याची मागणी केली. अचानक नातेवाईक मोठ्या संख्येने उपायुक्त कार्यालयात जमा झाल्याने पोलिसांचा फौजफाटा उपायुक्त कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला. शेवटी नातेवाइकांची समजूत काढण्यात येऊन मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

परस्परविरोधी गुन्ह्याची नोंद

नागम्मा भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीच्या परस्परविरोधी फिर्याद सुभाष भरत शिंदे (25, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, मृत नरेश ऊर्फ कृष्णा भंडारी, आदित्य (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT