येरवडा : पुढारी वृत्तसेवा
पुण्याच्या विविध भागांतील टेकड्यांवर पडलेल्या रिकाम्या बाटल्या अन् इतर निरुपयोगी वस्तूंचा कचरा गोळा करून त्याचा वापर परिसर सुशोभित करण्यासाठी करता येतो, याचेच प्रात्यक्षिक चंदननगर येथील पठारे शाळेत मिळाले. निमित्त होते युथ ग्रीन क्लब आणि जिओस्फिअर मॉडिफायर्स यांच्या वतीने आयोजित ग्लासिफाइड टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविणे या कार्यशाळेचे.या कार्यक्रमाअंतर्गत पुण्याच्या विविध टेकड्यांवर पडलेल्या मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या आणि अन्य टाकाऊ वस्तू जमा करून त्यांची रंगरंगोटी करण्यासह इतर साहित्य वापरून सुशोभित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या हस्ते झाले.
टेकड्यांवर पडून असलेल्या दारूच्या बाटल्यांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. अशा वेळी केवळ सामाजिक भावनेतून आणि पर्यावरणाप्रती असलेल्या प्रेमातून या संस्थांनी 'ग्लासिफाइड'सारखे नवीन उपक्रम निश्चितच उपयोगी ठरतात,' असे सांगत नगरसेवक महेंद्र पठारे यांनी या उपक्रमाचे आणि कौतुक केले.
या उपक्रमास साधारण 35 स्वयंसेवकांनी हजेरी लावली आणि जवळपास 100 बाटल्या सुशोभित केल्या. या वेळी युथ ग्रीन क्लबचे अध्यक्ष अथर्व गवळी, सचिव सोहम भोसले आणि जिओस्फिअर मॉडिफायर्सचे राहुल सोनवणे, अभिषेक दिघे, हिमानी चोपडे, वेद शास्त्री, दामिनी बेलदार आदी उपस्थित होते.