मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Pudhari
पुणे

Devendra Fadanvis: सनातनी म्हणजे वाईट हे ठसवण्याचा प्रयत्न!: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांचा तथाकथित धर्मनिरपेक्षवादी विचारसरणीच्या लोकांवर हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

पुणे : जगात जपान, थायलंडसह अन्य देशांमध्ये आपल्या संस्कृतीचा आणि ज्ञानाचा पगडा आहे. परंतु, आपल्याकडेच काही तथाकथित धर्मनिरपेक्षवादी विचारसरणी मध्यंतरीच्या काळात घुसली आणि धर्मनिरपेक्षता वादाच्या नावावर निधर्मी अशा प्रकारचे राज्य तयार करायचे, अशा प्रकारच्या विचारांनी आपण ग्रासलो आहोत. त्यातून आपल्या प्रथा, परंपरा चुकीच्या वाटायला लागल्या. त्यातूनच सनातनी म्हणजे वाईट हे ठसवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून अनेक पिढ्या तयार झाल्या, ज्यांना आपला इतिहास माहीत नाही. त्यामुळे एकप्रकारे तथाकथित धर्मनिरपेक्षवादी विचारसरणीच्या लोकांकडून संस्कृतीचे हनन झाल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Pune News Update)

प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मध्यप्रदेशचे सार्वजनिक बांधकाममंत्री राकेश सिंह, मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आपला इतिहास, आपल्या परंपरा, आपले ज्ञान, आपली संस्कृती, या सगळ्या गोष्टींचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या समाजाचे आत्माभिमान आणि समाजाचे तेज समाप्त करण्याचे काम परकीय आक्रमकांनी केले. त्यामुळेच आपण पारतंत्र्यात गेलो. भारत हा अतिशय समृद्ध असा देश होता. म्हणूनच हे सर्व लुटारू भारतामध्ये आक्रमण करायचे आणि आपला जो काही खजिना होता, संपत्ती होती ती लुटून घेऊन जायचे.

भारताची शक्ती ही भारताचे ज्ञान आणि संस्कृती आहे, हे लक्षात घेऊन आमच्या ज्ञानाची केंद्रं उद्ध्वस्त करणे, आमच्या संस्कृतीची प्रतिके जमीनदोस्त करणे आणि हळूहळू त्यांची संस्कृती, त्यांचे ज्ञान, त्यांच्या परंपरा यांचा पगडा बसविणे हे काम सातशे ते हजार वर्षे चालले आहे. त्यातूनच आमचा आत्माभिमान कमी झााला. यातून अशा पिढ्या तयार झाल्या की ज्यांना आपला इतिहासच माहिती नाही. आम्हाला भारतात आर्यांनी आक्रमण केले, हे शिकवण्यात आले. त्याचे पुरावे दाखवा म्हटल्यावर आर्य भारतात फिरत आले, असे सांगण्यात आले. त्याचे पुरावे मागितल्यावर ते देखील दाखवता आले नाही. आता आऊट ऑफ इंडियन थेअरी सिद्ध झाली आहे. यातून भारतीय लोक जगात गेले, त्यातून भारतीय संस्कृती जगात गेली असल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत.

भारत ही एकमेव संस्कृती आहे. जी पूर्वीपासून चालत आलेली आहे. पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी देशात पूर्ण विकसित शहरे अस्तित्वात होती. यामध्ये आजच्या स्थापत्यशास्त्राला अपेक्षित सर्व गोष्टी त्या काळात अस्तित्वात होत्या. त्याकाळी बहुमजली इमारतीदेखील होत्या. ज्याकाळात जगाला संस्कृती म्हणजे काय हे माहीत नव्हते. त्या काळात देखील आपण पूर्ण विकसित स्वरूपात होतो. राखीगढी, विर्‍हाणा आदी ठिकाणी उत्खनन केल्यानंतर ही सिंधूसंस्कृती देखील आहे आणि सरस्वती संस्कृती देखील आहे, ती दहा हजार वर्षांपूर्वीची असून त्या काळात पूर्ण विकसित स्वरूपात संस्कृत भाषा आपल्याला माहीत होती. मुघल आणि इंग्रज यांच्या दरम्यान हिंदवी स्वराज्य होते हे आजच्या पिढीला आम्ही शिकवू शकलो नाही. त्यामुळे आमचे ज्ञान, संस्कृती, परंपरा, हे माहिती असणे गरजेचे आहे. ही परंपरा आपल्याला पुढे न्यावी लागणार असल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

डॉ. गो. बं. देगलुरकर म्हणाले, जगातील पहिली संस्कृती भारतीय आहे. आपली संस्कृती सनातन आहे. सनातन म्हणजे काय हे लोकांना माहीत नाही. सनातनम नित्य नुतनम म्हणजे नेहमी ती बदलत असते. आमचे सर्व ग्रंथ समाज बदलत गेला तसे बदलत गेले. आपण किती समृद्ध होतो हे लोकांच्या लक्षात येत नाही. संस्कृती बदलत जाते. परंतु, संस्कृतीचा प्रवाह तोच आहे. 2014 नंतर मात्र ज्ञानाचा सूर्य उगवल्यासारखे वाटत असल्याचे देखील डॉ. देगलुरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पाडे, राकेश सिंह यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रशांत पोळ यांनी पुस्तक निर्मितीची पार्श्वभूमी समजून सांगितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT