पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, काँग्रेसकडून प्रचाराची सूत्रे विदर्भातील नेते, माजी मंत्री सुनील केदार आणि यशोमती ठाकूर यांच्यासह सहा नेत्यांवर सोपविण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यांचे मतदान झाले असून, तिसर्या टप्प्याचे मतदान आज मंगळवारी (दि.7) होत आहे, तर चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. पुणे लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्याचबरोबर प्रचारात सुसूत्रता यावी, यासाठी काँग्रेसने निवडणूक झालेल्या विदर्भातील नेत्यांच्या समन्वयक व निरीक्षक म्हणून नियुक्त्या केल्या आहेत.
काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार आणि यशोमती ठाकूर यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केदार यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या वेळीदेखील केदार यांच्याकडेच पुण्याची जबाबदारी होती, त्याला यश आले. तसेच यश लोकसभेतही येईल, असा विश्वास काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला. याशिवाय लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये विकास ठाकरे (वडगाव शेरी), धीरज लिंगाडे (शिवाजीनगर), अभिजित वंजारी (कोथरूड), अमित झनक (पर्वती), राजी आवळे (पुणे कॅन्टोन्मेंट), सुभाष धोटे (कसबा) यांचा समावेश आहे.
हेही वाचा