Smita Jadhav Pudhari
पुणे

Smita Jadhav: अमरीश पुरी, निळू फुलेंच्या आवाजातून डॉ. स्मिताताई जाधव यांना मतदानाचे आवाहन

पुण्यातील कला- सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा डॉ. स्मिताताई जाधव यांना पाठिंबा; कलाकारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘जितने भी पदवीधर मतदाता हैं, उनसे मैं निवेदन करना चाहता हूँ कि डॉ. स्‍मिताताई योगेश जाधव को वोट देकर विजयी बनाइए।’ हे ज्येष्ठ अभिनेते अमरिष पुरी यांच्या खर्जातल्या आवाजात केलेले आवाहन असो वा डॉ. स्मिताताई जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या आवाजात मतदान करण्याविषयी केलेले आवाहन...

या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या आवाजातील हुबेहूब नक्कल करत कलाकार योगेश सुपेकर यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप- महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्यासह पुण्यातील कला- सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींनीही डॉ. जाधव यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला.

गुरुवारी (दि. १५) दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयात रंगकर्मी, नाट्यनिर्माते, निवेदक, लावणी निर्माते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधी एकत्र आले होते. या वेळी त्यांनी डॉ. जाधव यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला.

तर योगेश सुपेकर यांनी आपल्या खास शैलीत विविध कलावांतांचे आवाज काढत डॉ. जाधव यांना मतदान करण्याचे आवाहन केले. वडिल डॉ. पी. डी. पाटील यांच्याप्रमाणेच डॉ. स्मिताताई जाधव यांचे कला - सांस्कृतिक क्षेत्राशी जवळचे नाते आहे. त्यामुळे डॉ. जाधव यांनाही या क्षेत्रातील प्रश्नांची जाण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

कला क्षेत्रातील पदवीधरांना रोजगाराच्या संधी, कलाकारांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक यांना प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या वेळी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, नृत्यदिग्दर्शिका आणि पिंपरीमधील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल आर्ट्समधील डान्स ॲण्ड कोरिओग्राफी विभागाच्या प्राध्यापिका आणि समन्वयक निकिता मोघे, ऑल ऑर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, भाजप सांस्कृतिक आघाडीचे शहर उपाध्यक्ष सागर घोडके, लावणी निर्माते गणेश गायकवाड, ऑल ऑर्टिस्ट फाउंडेशनचे खजिनदार आणि संगीत संयोजक रशीद शेख उपस्थित होते. दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश जाधव यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

नाट्य क्षेत्रासमोर आज अनेक प्रश्न आहेत. नाट्यप्रयोगांसाठी पुरेशी आणि सोयीसुविधांनी युक्त नाट्यगृहे उपलब्ध होणे आवश्यक आहे. नाट्यगृहांतील सुविधांपासून ते नाट्यकर्मींच्या अडचणींपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची जाण असणारे आणि ते शासनापर्यंत पोहोचविणारे प्रतिनिधित्व विधानपरिषदेत असावे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या माध्यमातून नाट्य क्षेत्राच्या प्रश्नांना योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- सुनील महाजन, अध्यक्ष, नाट्य परिषदेची कोथरूड शाखा
नृत्य आणि इतर कलाप्रकारांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे रोजगाराच्या संधी मिळणे महत्त्वाचे आहे. कला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळून उपयोग नाही, तर त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ आणि कामाच्या संधी मिळायला हव्यात. कलाकारांसाठीच्या योजना, प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मिती यांना प्राधान्य मिळावे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्यात प्रभावी नेतृत्व आहे. डॉ. जाधव या नक्‍कीच पदवीधर कलाकारांसाठी महत्त्वपूर्ण काम करतील.
- निकिता मोघे, नृत्यदिग्दर्शिका
कला- सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना रोजगाराच्या संधी, सादरीकरणासाठी व्यासपीठ आणि शासकीय योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. नाट्यगृहांची कमतरता, ज्येष्ठ कलावंतांचे रखडलेले अनुदान, मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांत शो मिळण्यातील अडचणी आणि कलादालनांची दुरवस्था असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची जाण असणारे प्रतिनिधित्व विधानपरिषदेत असणे महत्त्वाचे आहे. कलाकारांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यावर ठोस उपाययोजना व्हाव्यात, तसेच कलाकारांसाठी विविध योजना राबविणे आणि त्यांच्या रोजगारनिर्मितीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पदवीधर कलावंतांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलावंतांच्या मुलांना पदव्युत्तर शिक्षणाच्या शुल्कात सवलत देणे आवश्यक आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या माध्यमातून हे प्रश्न नक्कीच सुटतील.
- योगेश सुपेकर, अध्यक्ष, ऑल ऑटिस्ट फाउंडेशन.
लावणीसह लोककला आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांसमोर अनेक अडचणी आहेत. कलाकारांना सादरीकरणासाठी संधी मिळणे, त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ उपलब्ध होणे आणि आर्थिक स्थैर्य मिळणे आवश्यक आहे. ज्येष्ठ कलावंतांचे अनुदान वेळेत मिळावे, तसेच कलाकारांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. या प्रश्नांकडे लक्ष देणारे प्रतिनिधित्व मिळाल्यास सांस्कृतिक क्षेत्राला त्याचा फायदा होईल.
- गणेश गायकवाड, लावणी निर्माते
विविध कला क्षेत्रांत काम करणाऱ्या कलाकारांच्या समस्या वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांना आर्थिक स्थैर्य, कामाच्या संधी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची गरज आहे. कलाकारांच्या प्रश्नांची शासनदरबारी मांडणी होऊन त्यावर ठोस निर्णय व्हावेत. कलावंतांना केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदत आणि कामाच्या संधी मिळणे महत्त्वाचे आहे.
- रशीद शेख, खजिनदार, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन
कला- सांस्कृतिक क्षेत्रातील पदवीधरांना एकत्र आणून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर डॉ. स्मिताताई जाधव यांनी नेहमीच भर दिला आहे. कलाकार, साहित्यिक, नाट्यकर्मी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींशी त्या नेहमी संपर्क साधतात. त्यांचे प्रश्न जाणून घेतात. त्यामुळेच सांस्कृतिक क्षेत्रातील पदवीधरांनी निवडणुकीत सहभागी होऊन आपल्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या प्रतिनिधीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आहे.
- सागर घोडके, शहर उपाध्यक्ष, भाजप सांस्कृतिक आघाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT