School Development Pudhari
पुणे

Tribal School Development: पारधी समाजातील ७५० विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट; खामगाव आश्रमशाळेत उभारले अत्याधुनिक क्रीडा संकुल

शिक्षणासोबत रोजगारक्षम कौशल्यांवर भर; व्हॉलिबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल मैदानांसह बंदिस्त प्रेक्षागृहाची निर्मिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सामाजिक बांधिलकी जपत अमनोरा येस फाउंडेशनने बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळेचे पालकत्व स्वीकारून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि बंदिस्त प्रेक्षागृह उभारले आहे.

या क्रीडा संकुलाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असल्याची माहिती अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष व सिटी ग्रुपचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली. या वेळी विवेक कुलकर्णी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, की या आश्रम शाळेची स्थापना परमपूज्य भय्यूजी महाराज यांनी केली होती. त्यानंतर श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट आणि अमनोरा येस फाउंडेशन यांनी २०१४ मध्ये शाळेची जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थ्यांच्या क्रीडा-कौशल्याला चालना मिळावी, यासाठी फाउंडेशनने शाळेत व्हॉलिबॉल, हँडबॉल आणि बास्केटबॉलची स्वतंत्र मैदाने, तसेच सुसज्ज बंदिस्त प्रेक्षागृह उभारले आहे.

खामगावमधील या आश्रमशाळेत सध्या पारधी समाजातील सुमारे ७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, मोटर मेकॅनिक आणि ब्युटी पार्लर या व्यावसायिक अभ्यासक्रमांचीही सुरुवात केली आहे.

फाउंडेशनच्या 'स्वयंसिद्ध' उपक्रमांतर्गत जुन्या साड्यांपासून विद्यार्थिनींकडून आकर्षक कापडी पिशव्या तयार करून घेतल्या जातात. प्रत्येक पिशवीमागे विद्यार्थिनींना २५ रुपये मानधन दिले जाते. या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यात १० हजार रुपये जमा केले असून, ही रक्कम ८ ऑगस्ट रोजी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT