Amit Shah Pudhari
पुणे

Amit Shah: राहुल गांधींवर अमित शहांचा हल्लाबोल; काँग्रेसला पुढील ३० वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागेल

तळेगाव दाभाडेत सहकार क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्घाटन; मुंबई-पुण्यानंतर कोल्हापूर, नाशिक, नागपूर, सोलापुरातही ‘भारत टॅक्सी’

पुढारी वृत्तसेवा

पुणे (वडगाव मावळ): आंतरराष्ट्रीय संमेलनात देशाच्या विरोधी विचार व्यक्त करून काँग्रेस नेते राहुल गांधी हे जगभरात भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात कौतुक होत असताना जागतिक व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि भारताच्या विकासाला बदनाम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. अशा परिस्थितीत पुढील ३० वर्षे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागेल. त्यांची सत्तेची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाही, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे राहुल गांधी आणि काँग्रेसवर रविवारी येथे केला.

तळेगाव दाभाडे येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह सहकारी संस्थेच्या नूतन प्रकल्पाचे भूमिपूजन, सहकारी संस्थांच्या निबंधक प्रादेशिक कार्यालयाचे उद्‌घाटन व भारत टॅक्सी प्रकल्पाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कृष्णपाल गुर्जर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, काँग्रेसने कधीही स्वतंत्र सहकार मंत्रालयाची मागणी किंवा ती निर्मितीचा प्रयत्न केला नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशात ७० वर्षांनंतर सहकार मंत्रालयाची सुरुवात केली आणि सहकार समृद्ध व बळकट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. काँग्रेसच्या काळात बंद पडलेले कारखाने आपण सुरू करून त्यांना नव संजीवनी देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि ती काळाची गरजही आहे. ही कंपनी साखर उत्पादन डेअरी प्रकल्प इथेनॉल निर्मिती यासाठी लागणारी यंत्रसामग्री तयार करणार असून विदेशात जाणारे कंटेनरही या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी शहा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चार टॅक्सी चालकांना भाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मावळच्या वतीने माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अमित शहा यांचा संत तुकोबारायांची पगडी घालून विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही समयोचित भाषणे झाली.

मुंबई-पुण्यानंतर कोल्हापूर, नाशिक, नागपूर, सोलापुरातही ‘भारत टॅक्सी’!

वडगाव मावळ : मुंबई आणि पुण्यानंतर लवकरच कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि नाशिक येथेही भारत टॅक्सी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, भविष्यात हा प्रकल्प संपूर्ण देशभर विस्तारण्याचा विश्वास केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

पुणे ही सहकाराची गंगोत्री : अमित शहा

देशात सहकाराची सुरुवात झालेली ही पुण्यभूमी असून पश्चिम महाराष्ट्रात आज वाहणार्‍या सहकाराच्‍या गंगेची गंगोत्री पुणे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.

मुरलीधर मोहोळ यांचे विशेष कौतुक!

नॅशनल हेवी इंजिनिअरिंग हा बंद पडलेला कारखाना सुरू करण्यासाठी तसेच सहकारी संस्थांचे भारताच्या पश्चिम विभागातील निबंधक कार्यालय पुणे येथेच सुरू करावे व भारत टॅक्सीचा शुभारंभ पुण्यातच करावा, असा आग्रह केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी केला होता. सहकार क्षेत्रातील हे तीनही प्रकल्प मोहोळ यांच्या पाठपुराव्यानेच पुण्यात सुरू होत आहे, असा उल्लेख करत शहा यांनी मोहोळ यांचे विशेष कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT