पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. अजित पवार यांची राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांच्या निर्णयामुळे जनतेमध्ये निर्माण होणारी प्रतिक्रिया लक्षात घेता शहा यांनी त्यांना या निर्णयामागचे कारण विचारले होते. त्यावर ‘प्रत्येक गोष्टीचा एक कालखंड असतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे देशाचा विकास आणि महायुती या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवता येणार नाहीत. मला महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासोबत यायचे आहे,’ असे ठाम उत्तर अजित पवार यांनी दिले होते, असा गौप्यस्फोट अमित शहा यांनी केला.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी (ता. १६) अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला त्यांच्या नावाने नामकरण करण्याचा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी शहा यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या महायुती प्रवेशामागील घडामोडी सांगितल्या.
शहा म्हणाले, अजितदादांनी महायुतीसोबत येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला थोडे आश्चर्य वाटले. मी त्यांना विचारले की, दादा, तुमची एक राजकीय पार्श्वभूमी आहे. या निर्णयामुळे जनतेला आणि सर्वांनाच धक्का बसेल. सत्ता येते आणि जाते; मग एवढा मोठा निर्णय तुम्ही का घेत आहात? त्यावर अजितदादांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीमध्ये सहभागी होण्याची भूमिका स्पष्ट केली.
महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्याशी आपले नाते अधिक घट्ट झाले. निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी माझ्याशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी ठामपणे चर्चा केली. स्वतः मोठ्या पदावर असतानाही कार्यकर्त्यांशी असलेले नाते जपणारे नेते फार कमी असतात. अजितदादांनी कायम आपल्या कार्यकर्त्यांचा विचार केला. हा त्यांचा मोठा गुण होता, असे शहा यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागामुळे सरकारला स्थिरता आणि सातत्य मिळाले. त्यामुळे सरकारला अनेक कठोर निर्णय घेणे शक्य झाले. मात्र, अचानक अजितदादा आपल्यातून निघून गेले, ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आपण सुन्न झालो होतो. सकाळी साडेआठच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. अपघाताची माहिती आणि जखमींच्या बचावाची शक्यता कमी असल्याचे समजल्यानंतर मनाला मोठा धक्का बसला. त्यानंतर पाऊण तासात त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती मिळाली, असेही शहा यांनी सांगितले.
अजितदादांची काम करण्याची पद्धत, वेळेचे नियोजन आणि शिस्त ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांनी निर्माण केलेली कार्यशैली आगामी काळात तरुणांसाठी एका विद्यापीठाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला.