Crime Pudhari
पुणे

Ambegaon Crime: आंबेगावमध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू; संशयित पती फरार, मंचर पोलिसांचा तपास सुरू

थोरांदळे येथील शेतातील शेडमध्ये घटना उघड; संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

मंचर: आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील गुंडवस्ती परिसरात ३५ वर्षीय सपना दीपक पारधी हिचा डोक्यात वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणानंतर तिचा पती संशयित दीपक पारधी हा फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी मंचर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

सपना आणि तिचा पती दीपक पारधी हे सुमारे आठ दिवसांपूर्वी चांडोली येथील शेतकरी किसन इंदोरे यांच्या थोरांदळे येथील शेतात मजुरीच्या कामासाठी आले होते. मंगळवारी सकाळी शेजारील शेतकरी दत्तात्रय बारवकर शेतीवर फेरफटका मारून ते राहत असलेल्या पत्र्याच्या शेडकडे गेले असता, शेडबाहेरील कोपीत सपना पारधी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.

तिच्या दोन्ही चपला इतरत्र पडल्या होत्या. दत्तात्रय बारवकर यांनी आवाज दिला; मात्र, कोणतीही हालचाल न झाल्याने जवळ जाऊन पाहिले असता तिच्या डोक्यावर धारदार अथवा कठीण हत्याराने वार केल्याचे दिसून आले.

त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस पाटील वैशाली टेमगिरे व उपसरपंच ॲड. संदीप टेमगिरे यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी सपना यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर पती संशयित दीपक पारधी फरार झाला असून, खुनामागील नेमके कारण काय, याचा तपास मंचर पोलीस करीत आहेत.

ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. माहिती मिळताच तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई व्हावी.
ॲड. संदीप टेमगिरे, उपसरपंच, थोरांदळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT