लोणी-धामणी: आंबेगाव तालुक्यात अचनाक हवामान बदल होऊन थंडीचा कडाका कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, हरभरा, गहू, ज्वारी व तरकारी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उतर भारतातून येणाऱ्या शीत लहरीच्या प्रभावामुळे मागील आठवड्यात थंडीची लाट होती. आता मात्र अचानक वातावरणात बदल होऊन थंडीचा कडका कमी झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्याता वर्तवली जात आहे. थंडी रब्बीतील पिकांना पोषक ठरत असली तरी ढगाळ हवामानामुळे या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढणार आहे.
सध्या शेतातील गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, बटाटा व इतर तरकारी पिके जोमात आली आहेत. या पिकांवर आता औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लगत आहे. गेली दोन दिवस सायंकाळी सहा सात वाजण्याच्या सुमारास तुरळक पावसाचे थेंब पडल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावली तर हातातोंडाशी आलेली पिके भूईसपाट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.