पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील चांडोली बुद्रुक-खडकी परिसरात मंगळवारी (दि. 2) दुपारी चक्रीवादळासह जोरदार गारांचा पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे कांदा साठवणुकीसाठी उभारलेल्या अनेक बराक्यांमध्ये पाणी शिरून हजारो क्विंटल कांदा भिजला आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी लाकडी बराक्या उभारल्या असून, त्यावर शेडनेट व वैरणीचे आच्छादन केले होते. मात्र, चक्रीवादळाच्या तीव वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेडनेट उडून गेले किंवा फाटले. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे बराक्यांमध्ये पाणी शिरून कांदा भिजला.
खडकी फाटा येथील शेतकरी सुरेश दामोदर वाबळे यांनी लाकडी बराकीत 400 कांद्याच्या पिशव्या साठवून ठेवल्या होत्या. वादळामुळे बराकीवरील शेडनेट उडून गेल्याने पावसाचे पाणी थेट कांद्यावर पडले. परिणामी संपूर्ण कांदा भिजून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. भिजलेल्या कांद्याची गुणवत्ता घसरण्याबरोबरच तो सडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा कांदा उत्पादकांना सुरुवातीपासूनच कमी बाजारभावाचा फटका बसत आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.
कमी बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. नुकसानग््रास्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
आधी बाजारभावाचा फटका; आता निसर्गाचा तडाखा
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यातच चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे साठवलेला कांदा भिजल्याने नुकसान वाढले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नारायण बेट परिसराला झोडपले
देऊळगाव गाडा परिसरातील श्री सद्गुरू नारायण महाराज बेट परिसराला मंगळवारी (दि. 2) झालेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा मोठा फटका बसला. पहिल्याच पावसात शेती, झाडे तसेच संस्थेच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याने भाविक आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती देताना श्री सद्गुरू नारायण महाराज बेट संस्थेचे प्रमुख विश्वस्त संजय शितोळे यांनी सांगितले की, संस्थेच्या मालकीची शेती हा उपजीविकेचा प्रमुख आधार असून, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली असून, त्यामुळे संस्थेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
वादळी वाऱ्यामुळे बेट परिसरातील अनेक लिंबाची झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच, संस्थेच्या कार्यालयावरील पत्रे उडून गेल्याने कार्यालयीन व्यवस्थेचेही नुकसान झाले आहे. नुकसानग््रास्त भागाची महसूल प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई शासनामार्फत द्यावी, अशी मागणी श्री सद्गुरू नारायण महाराज बेट संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.