मंचर: आंबेगाव तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये विविध रानभाज्यांची रेलचेल सुरू झाली असून, आदिवासी भागात पारंपरिक चवींची मेजवानी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. असाणे, माळीण, आहुपे तसेच भीमाशंकर खोऱ्यातील डोंगरकपारी, जंगल परिसर आणि शेताच्या बांधावर उगवणाऱ्या रानभाज्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
आदिवासी कुटुंबे पिढ्यान्पिढ्या या नैसर्गिक भाज्यांचा आहारात उपयोग करतात. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्यांना स्थानिक खाद्यसंस्कृतीत विशेष महत्त्व आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे परिसरातील तसेच शहरातील खवय्येही त्यांचा आस्वाद घेण्यासाठी डोंगराळ भागाकडे येत आहेत.
सध्या पंदा (कंद), भारंगीची फुले, कर्टुली, तेरेची भाजी, बाराची भाजी, चायाची भाजी, हळदा कंद, बेंद्रीची फुले, चिचुरडा, रानतेरडा, कैलेची भाजी, रुखाळ्याची पाने, भोकराची भाजी आणि भोकऱ्याचा पाला अशा विविध रानभाज्या उपलब्ध होत आहेत. स्थानिक पद्धतीने त्यांच्यापासून विविध चविष्ट पदार्थ तयार केले जातात. काही ठिकाणी रानभाजी महोत्सवांच्या माध्यमातून या पारंपरिक खाद्यपदार्थांची नागरिकांना ओळख करून दिली जाते.
बाजारातील नेहमीच्या भाज्यांपेक्षा रानभाज्यांची चव व स्वरूप वेगळे आहे. त्यातून डोंगराळ भागातील निसर्ग, आदिवासी जीवनशैली आणि पारंपरिक ज्ञानाची अनुभूती मिळते. त्यामुळे ही खाद्यपरंपरा निसर्गाशी असलेले आदिवासी समाजाचे घट्ट नाते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम ठरत आहे.
रानभाज्या हा आदिवासी समाजाच्या पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे संवर्धन आणि योग्य ओळख होणे गरजेचे आहे. या माध्यमातून स्थानिक खाद्यसंस्कृती, पारंपरिक ज्ञान आणि निसर्गाशी असलेले नाते पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.- अरविंद मोढवे, आदर्श शिक्षक, माळीण