Farm Pudhari
पुणे

Ambegaon Rainfall Deficit: आंबेगावच्या उत्तर भागात पावसाची ओढ; घोड नदीची पाणीपातळी खालावल्याने शेतकरी संकटात

सोयाबीन, पालेभाज्या व बाजरी पिकांना पाण्याचा ताण; ओला चारा सुकला, बाजारभावाचाही फटका

पुढारी वृत्तसेवा

महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. घोड नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना अद्याप ढापे न बसवल्याने नदीची पाणीपातळी खोल गेली आहे. त्यामुळे नदीलगतच्या विहिरींना नदीपात्रातून पाणी येत नसल्याने शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे.

घोड नदीच्या काठावरील चांडोली खुर्द, महाळुंगे पडवळ, साकोरे, नांदूर, विठ्ठलवाडी आदी परिसरातील अनेक विहिरी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नदीपात्रातील पाणीपातळी खालावल्याने विहिरींमध्येही पाण्याची आवक कमी झाली आहे. उपलब्ध पाण्याचा वापर पिकांसाठी करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन, पालेभाज्या तसेच इतर खरीप पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागत आहे. काही भागात पावसाळी बाजरीचे पीकही पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. मागील एक महिन्यापासून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने शेती पाण्यासाठी आसुसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

ढगाळ वातावरण; पाऊस मात्र गायब

गेल्या काही दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे; मात्र, प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात दमटपणा असून, उष्णताही जाणवत आहे. पावसाअभावी जमिनीला भेगा पडण्यास सुरुवात झाली असून, पिकांची वाढ खुंटत आहे.

डोंगर भागात ओला चारा सुकला

तालुक्याच्या डोंगर भागात पावसाने ओढ दिल्याचा परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर देखील झाला आहे. पावसाळ्यात उपलब्ध होणारा ओला चारा सुकून गेल्याने पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांची पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

पालेभाज्यांना बाजारभावाचा फटका

पावसाअभावी पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता असतानाच बाजारपेठेतही शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीत. कांदा वगळता इतर पालेभाज्यांना समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याची चिंता आणि दुसरीकडे बाजारभावाचा फटका, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT