मंचर: आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. परंतु, पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे लागवड लांबणीवर पडत आहे. पाऊस न थांबल्यास बटाटा लागवडीत 40 टक्के घट होण्याची शक्यता आहे.
सातगाव पठारावर सततच्या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. 20 मे पासून सुरू झालेला पाऊस अजून थांबण्याचे नाव घेत नसल्याने खरिपाची पेरणी व बटाटा लागवड रखडली आहे. (Latest Pune News)
सातगाव पठार भागात गेली महिनाभर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेती कामांवर मोठा परिणाम झाला आहे. सातत्याने होणार्या पावसामुळे शेतकरी अजूनही पेरणीसाठी शेतात उतरू शकलेले नाहीत. बटाटा लागवड रखडल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतात सतत ओलसरपणा राहिल्याने तणांची वाढ झपाट्याने होत आहे.
पीक न लावता तण नियंत्रणासाठीच शेतकर्यांना आर्थिक खर्च करावा लागत आहे. शेतामध्ये तणनाशक हटवण्यासाठी फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेती उत्पादनाचा खर्च वाढला आहे. या परिस्थितीत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, तातडीने मदतीची योजना राबवावी अशी मागणी होत आहे.
चालू वर्षी जवळपास 40 टक्के क्षेत्रावरील बटाटा लागवड कमी होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत हवामान न सुधारल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे कारेगाव येथील प्रगतशील शेतकरी जयसिंग घेवडे, पेठ येथील बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले.
पाऊस थांबण्याची गरज
3400 ते 4000 रुपये क्विंटल बाजारभावानुसार शेतकर्यांनी बटाटा बियाणे खरेदी केले आहे. पाऊस थांबल्यानंतरच बटाटा लागवड करणे शक्य होणार आहे. पाऊस थांबण्याची नितांत गरज आहे, असे सातगाव पठार येथील अशोकराव बाजारे यांनी सांगितले.
पावसामुळे शेतात पाणीच पाणी साठले आहे. बियाणे खराब होईल या भीतीने लागवड करता येत नाही. तण मात्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तणनाशकाचा खर्च वाढत चालला आहे.- संजय पवळे, सरपंच पेठ, संजय कराळे, कारेगाव.
महिनाभरापूर्वी बटाटा बियाणे अनेक शेतकर्यांनी आणून ठेवले आहे. पावसामुळे ते लावता येत नाही. त्यामुळे बटाटा बेणे खराब होण्याची शक्यता आहे. सातगाव पठार भागात सुमारे साडेचार हजार एकर क्षेत्रावर खरीप हंगामात बटाटा बियाण्यांची लागवड केली जाते.- रामशेठ तोडकर, प्रगतशील शेतकरी पेठ.