पारगाव: गतवर्षीच्या हंगामातील बराकीत साठवून ठेवलेल्या कांद्याला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनखर्चही वसूल करता आला नाही. त्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.
अशातच यंदाच्या हंगामातील कांद्याची काढणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.सध्या बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरात सातत्याने घसरण होत आहे. परिणामी, मिळेल त्या दरात कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कांदा हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड केली जाते. मात्र, यंदा अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे अनेक बराकींमध्ये साठवलेला निम्म्याहून अधिक कांदा सडून गेला आहे.
बराकींतील कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेहनतीने पिकवलेले उत्पादन हातातून निसटत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. उत्पादन खर्च, मजुरी, खत-बियाणे आणि वाहतूक खर्च वाढले असताना बाजारभाव मात्र अत्यंत कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे, अशी माहिती पारगाव येथील शेतकरी सुभाष खंडू ढोबळे यांनी दिली.
कांदा हे नगदी पीक असले तरी सलग दुसऱ्या वर्षी बाजारभावाची साथ मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे,फ अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याला हमीभाव जाहीर करावा, साठवणूक व्यवस्था सक्षम करावी आणि बाजारातील दर स्थिर ठेवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.