मंचर: आंबेगाव तालुक्यात मान्सूनचे आगमन लांबल्याने केवळ शेतकऱ्यांसह कृषिसेवा केंद्र चालकांच्याही चिंतेत भर पडली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक कृषी दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात खते, बी-बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि कीडनाशकांचा साठा करून ठेवला आहे. मात्र, पाऊस नसल्याने शेतकरी खरेदीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला खरीप हंगामाची लगबग सुरू होते. शेतकरी पेरणीच्या तयारीसाठी कृषी दुकानांमध्ये गर्दी करतात. यंदा मात्र पावसाने दडी मारल्यामुळे व्यवहारांवर परिणाम झाला आहे. कृषी दुकानदारांनी मोठी भांडवली गुंतवणूक करून मालसाठा उपलब्ध ठेवला आहे. मात्र, विक्री अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने आर्थिक ताण वाढू लागला आहे.
पावसाअभावी पेरण्या रखडल्याने बी-बियाणे आणि खतांची मागणी मंदावली आहे. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास बाजारपेठेत हालचाल वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या मात्र कृषिसेवा केंद्रचालकांसह शेतकरीही मान्सूनकडे आशेने डोळे लावून बसले आहेत.
खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणात बी-बियाणे आणि खतांचा साठा केला आहे. मात्र, पाऊस नसल्याने शेतकरी खरेदीसाठी येत नाहीत. भांडवली गुंतवणूक अडकून पडली असून, आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.सोमनाथ पोंदे, कृषी केंद्र संचालक, पारगाव