आंबेगावात 4 हजार 702 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत Pudhari
पुणे

Farmers Compensation: आंबेगावात 4 हजार 702 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

1 हजार 314 हेक्टर क्षेत्र बाधित 3 कोटी 62 लाख 970 रुपयांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यात मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम दोन महिने उलटून गेले तरीही खात्यात जमा झाले नसल्याने हजारो शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्यात मे आणि जून महिन्यात पावसाने 95 गावांमधील 4 हजार 703 शेतकरी बाधित झाले असून, 1313.44 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

राज्य शासनाकडे 3 कोटी 63 लाख 970 रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. (Latest Pune News)

राज्य शासनाच्या आदेशानुसार मे महिन्यात आंबेगाव तालुक्याच्या लोणी, कुरवंडी, चास, नारोडी, लौकी, चांडोली, गिरवली, टाकेवाडी या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. यामुळे बाजरी, भुईमूग, पालेभाज्यावर्गीय पिके ज्यामध्ये कोथिंबीर, शेपू, टोमॅटो, फ्लॉवर या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. काढणीयोग्य असलेली बाजरी काळी पडली. सरमाड वैरण जाग्यावरच सडून गेली. कणसे भिजल्याने त्याला चौरे (मोड) फुटले. संपूर्ण बाजरीचे पीक भुईसपाट झाले होते.

सध्या पावसाने उसंत घेतल्याने शेतात वाफसा झाला आहे. उर्वरित पेरण्या करण्यात शेतकरी मग्न आहे तर अतिपावसामुळे वाया गेलेल्या पिकाच्या ठिकाणी दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकर्‍यांपुढे उभे आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाचे तहसीलदार यांनी गावागावांतील तलाठी, कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांना लेखी स्वरूपात दिल्या होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष बांधावर जात वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात आले. सुमारे 3 कोटी 62 लाख 970 रुपयाचे नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत तालुक्यातील शेतकरी आहेत.

या भरपाईमध्ये फळबागा, जिरायत पिके व बागायत पिके अशी वर्गवारी करण्यात आली आहे. फळबागांना हेक्टरी 22 हजार 500 रुपये तर बागायत पिकांना हेक्टरी 17 हजार रुपये व जिरायत पिकांना हेक्टरी 8 हजार 500 रुपये नुकसानभरपाई देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना राज्य शासनाकडून एक रुपयादेखील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
- बाबासाहेब खालकर, अध्यक्ष, ऊस उत्पादक संघ
दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकर्‍याला बी-बियाणे, खते घेण्यासाठी पैशांची गरज आहे.
- रमेश खिलारी, माजी अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT