महाळुंगे पडवळ: यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील सुमारे 10 हजार शेतकरी होणार थकबाकीदार होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पीककर्ज परतफेडीस मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आंबेगाव तालुक्यात सुमारे 13 हजार शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरअखेर पीककर्ज भरावे लागणार आहे. अन्यथा, सर्व शेतकरी थकबाकीदार होणार आहेत. थकीत पीककर्जावर 11 टक्के व्याज अधिक 1 टक्का दंड भरावा लागणार आहे. (Latest Pune News)
मात्र, खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही. परिणामी, वेळेत शेतकरी पीककर्ज भरू शकत नाही. त्यामुळे पीककर्ज भरण्यास तीन महिने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी किसान काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ तानाजी इंदोरे यांनी केली आहे.
मागील पाच महिने पडत असलेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक पिके पाण्यात गेली आहेत. बराकीत साठवलेल्या कांद्याला बाजारभाव नाही. बदलत्या वातावरणामुळे कांदा सडला आहे. तर टोमॅटो पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसचे सततच्या पावसामुळे टोमॅटो सडले आहेत.
सातगाव पठार भागातील काढणीला आलेल्या बटाट्याच्या शेतात पाणी साचले आहे. तर उशिरा पेरणी झालेले सोयाबीन पावसाने काही प्रमाणात कुजले आहे. दुबार पेरणी केलेल्या सोयाबीनला अपेक्षित उत्पादन येणार नाही. त्यामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कांद्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
त्यातच रब्बी हंगामासाठी 59 सहकारी संस्थामधून सुमारे 13 हजार शेतकऱ्यांनी 84 कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले आहेत. त्यातून ऊस, कांदा, बटाटा, टोमॅटो आदी पिकांची लागवड केली आहे. या पीककर्ज परतफेडीची सहा महिने मुदत होती. हे कर्ज मुदतीत फेडल्यास शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ होणार होता.
आता मात्र सप्टेंबरअखेर 30 टक्के शेतकरी पैसे भरू शकतात. ज्या पिकांसाठी हे पीककर्ज घेतले होते, ती पिके पावसामुळे वाया गेली आहेत. मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च त्यात बी बियाणे व जमिनीची मशागत खते औषधे घेण्यासाठी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीककर्ज उचलले होते. शासनाने एका गुंठ्याला 110 रुपये इतके तुटपुंजे पीककर्ज दिले आहे. हे पीककर्ज 30 सप्टेंबरअखेर भरले नाही तर तो शेतकरी थकबाकीदार म्हणून घोषित होणार आहे.
यंदा शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडल्याने जगायची कशी याची चिंता पडली आहे. त्यातच पीककर्जाचे पैसे कसे भरावयाचे ही समस्या भेडसावत आहे. थकबाकीदार शेतकऱ्याला इतर वित्तीय संस्था कर्ज देणार नाहीत. त्याचबरोबर थकित कर्ज त्यावर येणारे नोटीस व इतर खर्च करावा लागणार आहे. परिणामी, शेतकऱ्याला सावकाराच्या दारात उभे राहण्याशिवाय पर्याय उरणार नाही. हे टाळण्यासाठी कर्जमाफीची मागणीही शेतकरी करू लागले आहेत.