Census Pudhari
पुणे

Ambegaon Census 2027: आंबेगाव तालुक्यात जनगणना 2027 साठी सज्जता; 1 मेपासून सुरुवात

146 गावांचा समावेश; दोन टप्प्यांत प्रक्रिया, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक

पुढारी वृत्तसेवा

मंचर: आंबेगाव तालुक्यात जनगणना-2027 ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. 1 मेपासून जनगणना सुरू होणार असून, तालुक्यात दोन टप्प्यांत एकूण 146 गावांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली.

तहसील कार्यालय घोडेगाव यांच्यामार्फत जनगणनेसाठी 434 प्रगणक व 75 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, मंचर नगरपंचायतीकडून 61 प्रगणक व 11 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनगणनेचे काम प्रभावीपणे पार पाडले जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी 8 फील्ड ट्रेनर नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 23 एप्रिल ते 4 मे 2026 या कालावधीत चार टप्प्यांत एकूण 12 बॅचचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द येथे सुरू आहे.

दोन टप्प्यांत प्रक्रिया

पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना केली जाणार असून, घराचा प्रकार, पिण्याचे पाणी, शौचालय, वीजसुविधा तसेच कुटुंबाची मूलभूत माहिती संकलित केली जाणार आहे. या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 यादरम्यान नागरिकांना स्वगणना पद्धतीने या संकेतस्थळावर माहिती ऑनलाइन भरता येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना करणार आहेत. प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT