Pune Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Supply: दिवसाआड पाणीपुरवठ्याचा फज्जा; कमी दाब, उशिरा व गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण

तीन दिवसांत ५९३ तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच महापालिकेच्या नियोजनातील त्रुटी समोर आल्यात. कमी दाबाने पाणी येणे, नियोजित वेळेपेक्षा उशिरा पुरवठा होणे, अनेक भागांत नळ कोरडे राहणे, तसेच गढूळ पाणी येणे, अशा समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

आतापर्यंत महापालिकेकडे ५९३ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी केवळ २३७ तक्रारींचे निराकरण झाले आहे. उर्वरित तक्रारींवर काम सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपायुक्त नंदकुमार जगताप यांनी दिली.

एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्यापूर्वी पुरेसे नियोजन झाले होते का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. अनेक भागांत अवघे १५ ते ३० मिनिटेच पाणी येत असून, त्याचाही दाब अत्यंत कमी आहे. काही भागांत गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी अनेक कुटुंबांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. वाढत्या मागणीमुळे महापालिकेच्या टँकर फेऱ्या १,४०० वरून १,५०० पर्यंत वाढवाव्या लागल्या आहेत.

शहराच्या पूर्व भागात परिस्थिती अधिक गंभीर आहे. हांडेवाडी, औताडेवाडी, होळकरवाडी आणि महंमदवाडीतील काही भागांत चार ते सहा दिवसांनी पाणी मिळत असल्याची तक्रार आहे. मांजरी परिसरातील बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्या असून नळाद्वारे होणारा पुरवठाही अत्यल्प आहे.

खराडीत सुरुवातीला पिवळे व गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवावे लागत आहे. शिवसृष्टी-आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्षभरापासून एक दिवसाआड आणि कमी दाबानेच पाणी मिळत असल्याची नागरिकांची व्यथा आहे. शुक्रवार पेठ, महात्मा सोसायटी (कोथरूड) यासह अनेक भागांतही कमी दाबामुळे पाण्याच्या टाक्या भरत नसल्याची तक्रार आहे.

कोथरूड, बाणेर आणि बालेवाडीतील तक्रारी सोडविल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी हडपसर, काळेपडळ, शांतीनगर, महंमदवाडी, सय्यदनगर, केशवनगर आणि खराडीतील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई कायम आहे.

दत्तवाडी परिसरात अशुद्ध व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः पाहणी करून अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी उपाययोजना तयार करण्याचे निर्देश दिले. मात्र, अशा योजना संकट निर्माण झाल्यानंतरच का आखल्या जातात, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

दरम्यान, टँकरद्वारे पाणीपुरवठा अधिक वेगाने करण्यासाठी उंड्री येथे नवीन टँकर पॉइंट सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे उंड्री आणि पिसोळी परिसरात टँकर पोहोचविण्यास लागणारा वेळ कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टँकरचे शुल्क कमी करा

वडगाव खुर्द येथील टँकर पॉइंटवरून खासगी टँकरधारकांनाही पाणी भरण्याची परवानगी द्यावी. तसेच महापालिकेकडून आकारले जाणारे ६५० रुपयांचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी केल्यास नागरिकांना कमी दरात पाणी उपलब्ध होईल आणि पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे गटनेते सोपान ऊर्फ काका चव्हाण आणि नगरसेवक सुभाष नानेकर यांनी केली.

वेळ बदलल्याने नागरिकांची गैरसोय

प्रभाग क्रमांक १२ मध्ये पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ३ अशी केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दिवसभराच्या वेळेमुळे अनेकांना पाणी साठविणे शक्य होत नाही. त्यातच कमी दाबामुळे पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाणीपुरवठ्याची वेळ पूर्ववत किंवा नागरिकांना सोयीची करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका पूजा जागडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT