पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात यंदा हापूस आंब्याच्या हंगामाची सुरुवात चक्क कर्नाटकने झाली आहे. दरवर्षी रत्नागिरीतून येणारी पहिली आवक यंदा मात्र कर्नाटकातील तुमकूर भागातून झाली असून, त्यामुळे आंबा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
कर्नाटकातील शेतकरी जी. एम. शफीउल्ला यांच्या शेतातून सहा पेट्यांची पहिली आवक रोहन सतीश उरसळ यांच्या गाळ्यावर दाखल झाली. चार डझनांच्या एका पेटीला लिलावात तब्बल 5 हजार 100 रुपये दर मिळाला. सुरेश केवलाणी व बोनी रोहरा यांनी या पेट्यांची खरेदी केली.
या वेळी मार्केट यार्डात अडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्यासह अन्य अडतदार उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच कर्नाटकातून लालबाग आंब्याची आवक झाली होती. त्यानंतर आता हापूसचीही बाजारात एंट्री झाली आहे. नेहमीपेक्षा तब्बल 20 ते 25 दिवस आधी हापूसची आवक झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 30 टक्के अधिक भाव मिळाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मागील वर्षी हवामान बदलाचा फटका बसल्याने कर्नाटकातील उत्पादन घटले होते. मात्र, यंदा पोषक हवामानामुळे उत्पादन वाढल्याने आवक अधिक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. फेबुवारीमध्ये तुरळक आवक राहणार असून, हापूसचा नियमित हंगाम यंदा एप्रिलऐवजी मार्चमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हापूसचा दर्जा उत्कृष्ट असल्याचेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.
पोषक हवामानामुळे यंदा कर्नाटकातील हापूस लवकर बाजारात आला आहे. नेहमीच्या तुलनेत यंदा अधिक आवक होईल.रोहन उरसळ, कर्नाटक आंबा व्यापारी