’त्या’ शिक्षकाच्या पेन्शनमधून मिळणार पत्नीसह मुलीला पोटगी; दहा वर्षांनंतर पोटगी मंजूर Pudhari File Photo
पुणे

Pune: ’त्या’ शिक्षकाच्या पेन्शनमधून मिळणार पत्नीसह मुलीला पोटगी; दहा वर्षांनंतर पोटगी मंजूर

आर्थिक अडचणीत आणू पाहणार्‍याला न्यायालयाचा दणका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वैचारिक मतभेद आणि त्यामधून होणार्‍या वादातून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणार्‍या पतीपासून पत्नी 2014 साली विभक्त झाली. यादरम्यान पतीकडून पोटगी मिळावी, यासाठी पत्नीने न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने दरमहा सात हजार रुपये पोटगीचा आदेश दिला.

न्यायालयाच्या आदेशानंतरही पत्नी व मुलीला आर्थिक अडचणीत आणण्याच्या दृष्टीने पती सातत्याने प्रयत्न करीत होता. अखेर घटस्फोटाच्या दहा वर्षांनंतर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी पतीच्या निवृत्तिवेतनातून थकीत पोटगीची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या निकालामुळे दहा वर्षांनंतर माय-लेकीच्या पोटगीचा कायमस्वरूपी तोडगा निघाला. (Latest Pune News)

वैभव आणि वैभवी (दोघांचीही नावे बदललेली आहेत) यांचा 2014 साली घटस्फोट झाला. यादरम्यान वैभव हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. तर, वैभवी ही गृहिणी होती. घटस्फोटानंतर पोटगीसाठी वैभवी हिने न्यायालयात अर्ज केल्या. त्या वेळी न्यायालयाने वैभवने वैभवीसह मुलीला दरमहा सात हजार रुपये पोटगी स्वरूपात देण्याचा आदेश दिला.

त्या वेळी वैभव हा जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक होता. त्यामुळे त्याला चांगला पगारही मिळत होता. निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्तिवेतनासह बागायती जमिनीतून शेतीद्वारे चांगले आर्थिक उत्पन्न मिळत होते. मात्र, वैभव हा पत्नी व मुलीला आर्थिक अडचणीत आणण्याच्या उद्देशाने न्यायालयाच्या आदेशानंतरही पोटगी देत नव्हता.

2014 पासून वैभवीचा हा संघर्ष सुरू होता. अखेर मागील वर्षी तिने अ‍ॅड. तुषार मुंढे व अ‍ॅड. मयूर निगडे यांच्यामार्फत थकीत पोटगी मिळावी, यासाठी अर्ज केला. वेतन व शेतीचे उत्पन्न असूनही वैभव पत्नी व मुलीला जाणूनबुजून त्रास देण्यासाठी व त्यांचा आर्थिक छळ करण्यासाठी पोटगीपासून वंचित ठेवत असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. मुंढे व निगडे यांनी केला. या वेळी त्यांनी उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्याचा आधार घेतला. न्यायालयाने पतीच्या निवृत्तिवेतनातून दरमहा 15 हजार रुपयांचा डीडी कोर्ट क्रमाकांसह व पक्षकारांच्या नावानिशी पाठविण्यात यावा, असे आदेश दिले.

पोटगीसाठी वैभवी मागील दहा वर्षांपासून लढा देत होती. विलंबाने का होईना पोटगीचा कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. पोटगीची रक्कम मिळणार असल्याने माय-लेकीची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होऊन ते चांगले जीवन जगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- अ‍ॅड. तुषार मुंढे व अ‍ॅड. मयूर निगडे, पत्नीचे वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT