Crime Pudhari
पुणे

Junnar Crime: आळेफाटा हादरवणारी घटना; निर्दयी बापाकडून मुलांचा खून, मुलीचा मृत्यू

जुन्नरच्या जंगलात क्रूर कृत्य; 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी अवस्थेत वाचला

पुढारी वृत्तसेवा

आळेफाटा: एका निर्दयी बापाने स्वतःच्या चिमूरड्या मुलांचा क्रूरपणे गळा दाबून खूनाचा प्रयत्न केला त्यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. निर्दयी बापास पोलीसांनी अटक केली आहे.

या मुलांना बापाने पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील वरील जुन्नर तालुक्यातील आळेखिंड येथील जंगलात फेकून दिले. यावेळी साडेतीन वर्षे वयाच्या मुलीचा मृत्यू झाला असून सुदैवाने साडेपाच वर्षाचा मुलगा बचावला आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित बापाला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली.

हर्षदा सागर शिंदे (वय साडेतीन वर्ष रा. मोशी ता. हवेली) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी बाप सागर सदाशिव शिंदे (वय 29) यास अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शिंदे हा त्याची मुले हर्षदा व आर्यन (वय 5) यांना फिरायला घेऊन जात आहे असे आई वडिलांना सांगून मंगळवारी (दि 5) सकाळी साडेदहा वाजता मोशी येथील घरातून घेऊन गेला.

यानंतर तो पुढे पुणे नाशिक महामार्गाने नाशिक बाजूला गेला व तिथून परत रात्रीच्या सुमारास संतवाडी आळेखिंडी परिसरातील जंगलात आला. त्यानंतर त्याने या दोन्ही मुलांचा क्रूरपणे गळा दाबून त्यांना तेथील जंगलात फेकून दिले. बुधवारी (दि 6) सकाळी तो पुन्हा मोशी येथील आपल्या घरी आला त्यावेळेस त्याच्या आई वडिलांनी मुले कुठे आहेत असे विचारले असता त्यांनी सांगितले की चाकण येथे रूम घेतली आहे. मुले तेथेच आहेत. असे सांगून तो अंघोळ करून मुलांची कपडे घेऊन निघून गेला.

या घटनेनंतर बुधवारी (दि 6) सकाळच्या वेळेस आर्यन शुद्धीवर आला. महामार्गावर येत तो रडू लागला त्यानंतर तेथील संबंधित ग्रामस्थांनी वडगाव आनंद व आळे पोलीस पाटील यांचेशी संपर्क साधला. या मुलाला आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले. पोलिसांनी या मुलाकडे चौकशी केली असता त्याने आर्यन सागर शिंदे हे नाव व मोशी येथील रहिवाशी असल्याचे सांगितले.

पोलिसांनी नातेवाईकांना संपर्क साधला यावेळेस या मुलाचे आजोबा लक्ष्मण शिंदे नातेवाईकांसह आळेफाटा पोलीस स्टेशनला आले व त्यांनी हा आपलाच नातू असल्याचे सांगितले मात्र. हर्षदा नसल्याचे समजले. आळेफाटा पोलिसांनी मुलगा व नातेवाईक यांचेसह भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सागर शिंदे यास चाकण येथून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने मुलांना आळेखिंड येथील जंगलात गळा दाबून टाकल्याचे सांगितले. आळेफाटा पोलिसांनी सागर शिंदे यास आळे घटनास्थळी आणले. बुधवारी रात्रीच्या वेळेस हर्षदाचा मृतदेह मिळून आला. सागर शिंदे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT