आळेफाटा: सर्वदूर पावसामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात गुरुवारी (दि. २५) भरलेल्या संकरित गायींच्या आठवडे बाजारात चित्र पालटले आहे. येथे गायींची उच्चांकी आवक झाली. खरेदीस शेतकरी र्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने आर्थिक उलाढाल वाढली.
आळेफाटा उपबाजारात दर गुरुवारी भरणारा संकरित गायींचा आठवडे बाजार हा पुणे जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आळेफाटा येथील हा संकरित गायी बाजार शेतकऱ्यांसाठी केवळ खरेदी-विक्रीचे केंद्र नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा आणि पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणारा महत्त्वाचा बाजार म्हणून ओळखला जात आहे.
चांगल्या प्रतीच्या संकरित गायी उपलब्ध होत असल्याने पुणे तसेच इतर जिल्ह्यांतील शेतकरी येथे आवर्जून खरेदीसाठी येत असतात. यंदाच्या उन्हाळ्यात पावसाअभावी व चारा-पाण्याच्या टंचाईमुळे या बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले होते. गायींची खरेदी-विक्री कमी प्रमाणात होत असल्याने बाजारातील आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला होता.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या सर्वदूर समाधानकारक पावसानंतर परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला असून, पशुधन खरेदीकडे त्यांचा कल वाढला आहे.
परिणामी, बाजारात विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या संकरित गायींची संख्या वाढली असून, खरेदीदारांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारात विविध जातींच्या दुधाळ व दर्जेदार गायी उपलब्ध होत असल्याने व्यवहारांना गती मिळाली आहे.
व्यापारी व शेतकरी यांच्या मते, पावसामुळे चारा उत्पादनाची आशा निर्माण झाल्याने पशुपालन व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात गायी बाजारातील उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आळेफाटा उपबाजारात गुरुवारी (दि. २५) गायींची उच्चांकी आवक झाली.
खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाल्याने या आठवडे बाजारात ८४ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती सभापती संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे यांनी दिली. एकूण ४८० गायी विक्रीस आल्या होत्या. यातील ४१९ गायी व कालवडींची ५ हजार ते ५८ हजार रुपयांपर्यंत विक्री झाल्याचे संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे तसेच कार्यालयप्रमुख सतीश मस्करे यांनी सांगितले.