आळंदी:
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ।।
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ।।
टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला भक्तिकल्लोळ..माउली- माउली असा अखंड जयघोष.. वैष्णवांच्या मेळ्याने अन पुराणे भरून आलेला इंद्रायणीचा काठ..माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा..अशा वातावरणाने अलंकापुरी दुमदुमून गेली.
शहरातील इंद्रायणी नदीवरील पूरपरिस्थिती पाहता प्रशासनाने वारकऱ्यांना केलेले शहरात न येण्याचे आवाहन आणि आळंदी देवस्थानने केलेली मोजक्याच वारकरी,मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पाडण्याचे नियोजन यामुळे शहरातील रस्त्यावर अधिक गर्दी न होता तुरळक वारकऱ्यांची गर्दी दिसून येत होती; मात्र शहरात दाखल झालेल्या दिंड्यांनी उत्साहात पावसाच्या सरी झेलत हरिनाम गजरात फुगड्यांचे फेर धरल्याचे दिसून आले.
प्रदक्षिणा रस्त्यावरील दिंडीतील भाविकांनी फुगडीचा फेर धरला तर काहींनी टाळ मृदूंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला. शहरात प्रस्थान सोहळ्यानिमित्त उत्साह संचारला असून पालखी संध्याकाळी मंदिराबाहेर पडल्यानंतर त्यात अधिक भर पडणार असल्याचे दिसून येत आहे.