CRPF Jawan news Pudhari
पुणे

Alandi traffic jam death: वाहतूक कोंडीने घेतला निवृत्त जवानाचा बळी! आळंदीतील हृदयद्रावक घटना

सीआरपीएफचे निवृत्त जवान भिमाजी चौरे यांनी 23 वर्षे सीमेचं रक्षण केलं पण आपली कुचकामी यंत्रणा त्यांच्या जीवावर उठली.

पुढारी वृत्तसेवा

आळंदी: देवाच्या आळंदीची ओळख आता वाहतूक कोंडीची जीवघेणी आळंदी अशी बनण्याची भीती व्यक्त केली जातीये. कारण आळंदीच्या वाहतूक कोंडीत अडकून एका निवृत्त जवानाचा मृत्यू झालाय. सीआरपीएफचे निवृत्त जवान भिमाजी चौरे यांनी 23 वर्षे सीमेचं रक्षण केलं पण आपली कुचकामी यंत्रणा त्यांच्या जीवावर उठली.

चौरे रविवारी घरी होते, तेंव्हा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरु झाली पण शहरातील लग्न सोहळ्यामुळं होणाऱ्या वाहतुक कोंडीत ते अडकले आणि उपचाराला उशीर झाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यामुळं वाहतूक कोंडीने भिमाजी चौरेंचा जीव गेला, याची आपबिती त्यांच्या कुटुंबीयांनी मांडली. 23 वर्षे देशाची सेवा करणाऱ्या जवानाचा केवळ वाहतूक कोंडीमुळं मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जगन्नाथ पार्क परिसरात राहणाऱ्या भिमाजी चौरे यांना रविवारी राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर असलेल्या के.के. हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यासाठी कुटुंबीयांनी धावपळ सुरू केली.

मात्र, पद्मावती रोडवरील मंगल कार्यालयांमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्ता पूर्णपणे जाम असल्याने चारचाकी वाहन पुढे नेणे अशक्य झाले. अखेर गाडी रस्त्यातच सोडून कुटुंबीयांनी त्यांना रिक्षाने नेहण्याचा निर्णय घेतला.

रिक्षाला वाट मिळावी म्हणून चक्क चौरेंची पत्नी आणि मुलगी रस्त्यावर धावत जाऊन वाहनचालकांना विनवणी करत होते, मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु होता. तर दुसरीकडे मुलगा सीपीआर देऊन वडिलांना वाचवण्यासाठी धडपडत होता. पण रुग्णालयात पोहचेपर्यंत उशीर झाला होता.

अवघ्या 2-3 मिनिटांच्या अंतरासाठी 20 मिनिटे लागली. परिणामी गोल्डन आवरमध्ये ते रुग्णालयात पोहचू न शकल्यानं भिमाजी चौरेंचा मृत्यू झाला. अशी आपबिती त्यांच्या कुटुंबीयांनी मांडली. या घटनेमुळे आळंदीतील वाहतूक नियोजनाचा उडालेला बोजवारा एखाद्याचा कसा जीव घेऊ शकतो, हे यातून अधोरेखित झालं. आता मात्र आळंदी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने तोंडावर बोट ठेवलं आहे. त्यामुळं भविष्यात ही वाहतूक कोंडी फुटेल का? हा प्रश्न अनुत्तरित राहिलाय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT