Alandi Spiritual Education Institute Ban Pudhari
पुणे

Alandi Spiritual Education Institute Ban: आळंदीतील आध्यात्मिक शिक्षण संस्थेवर बंदी; 47 बालकांचे पुनर्वसन

नियमभंग व मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर कारवाई; बालकांना शासकीय बालगृहात हलवले

पुढारी वृत्तसेवा

आळंदी: आळंदी येथील जाहुरकर महाराज आध्यात्मिक शिक्षण संस्थेवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. या संस्थेतील 47 बालकांचे शासकीय बालगृहात पुनवर्सन केल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.

या संस्थेत आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या 12 वर्षीय मुलीवर शारीरिक व मानसिक शोषण झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत गुन्हा देखील दाखल झाला आहे. यावर तातडीने दखल घेत या संस्थेवर बंदीची कारवाई केली. संस्थेतील 43 मुले व 4 मुलींना तीन शासकीय बालगृहांमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे.

मुख्याधिकारी खांडेकर यांच्या नेतृत्वात शनिवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता नगरपरिषद अधिकारी, आळंदी दामिणी महिला पोलिस पथक आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी यांनी संस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत त्यांना अनेक गंभीर त्रृटी निदर्शनास आल्या.

महिला व बालविकास विभागाच्या 3 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार अनधिकृत व नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करत संस्था तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

या कारवाईत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या समवेत आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, नगरपरिषद कर व प्रशासकीय सेवा विभाग सीमा चारभे, लेखापरीक्षक प्रदीप आवारी, सहायक प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील, अभियंता मिथिल पाटील, कर्मचारी नाना घुंडरे, आळंदी पोलिस दामिणी पथकाच्या पूजा नाईक, श्वेता शेलकर, समुदाय संघटक अर्जुन घोडे, बाल संरक्षण अधिकारी शत्रुघ्न खोकले, पोलिस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे उपस्थित होते.

मुलांना निवासी ठेवण्याचा परवानाच नाही

संस्थेत विद्यार्थ्याचे प्रवेश अर्ज व आधार कार्ड नोंदी नव्हत्या. पालकांचे प्रवेश अर्ज व छाननी समिती अस्तित्वात नव्हती, नियमानुसार कर्मचारी वर्ग उपलब्ध नव्हता, अभ्यासिका व भोजन हॉल एकाच खोलीत होते. स्वयंपाकघर व निवासाची जागा अपूरी होती. पुरेशी व हवेशीर स्नानगृहे-स्वच्छतागृहे नव्हती. भोजनाचा निश्चित मेनू नव्हता आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीचे उरलेले अन्न सकाळी दिले जात होते. याशिवाय गेट रजिस्टर, प्रथमोपचार पेटी, तक्रार पेटी आणि नियम-अटींचे फलकही संस्थेत नव्हते. तपासणीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संस्थेकडे मुले व मुली निवासी ठेवण्याचा शासनाच्या कोणत्याही विभागाचा वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT