आळंदी : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार (दि. 10) पासून सुरू झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी दिली.(Latest Pune News)
आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी प्रचारास सुरवात केली होती. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाची आळंदी नगरपरिषद निवडणुकीबाबत युती अथवा आघाडी जाहीर होत नसल्याने इच्छुक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे अनेक इच्छुकांनी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादीकडून देखील उमेदवारी मागितली आहे. त्यासाठी मुलाखती देखील दिल्या आहेत. कोणत्याही पक्षातून तिकीट मिळो, आता लढायचेच अशी त्यांची भूमिका आहे.
पक्षात बंडखोरी होऊ नये याची काळजी घेत भाजपने उमेदवारीपासून ते पॅनल प्रचारापर्यंत सर्वच सूत्रे वरिष्ठ पातळीवर ठेवली आहेत. भाजपचा उमेदवार जाहीर होत नसल्याने इतर पक्षदेखील उमेदवार जाहीर करण्याबाबत शांत आहेत. नेहमीप्रमाणे स्थानिक आघाडीचे गणित पुढे येण्याच्या शक्यतेने गोंधळात भर पडली आहे. कोणत्याच पक्षाचे एबी फॉर्म नसल्याने इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी अर्ज दाखल केंद्राकडे पाठ फिरविली.
एकीकडे कोणत्याच पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला नसला तरी सध्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या प्रशांत कुऱ्हाडे, तुषार घुंडरे यांनी सर्वच प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.