कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात पालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येत आहे Pudhari
पुणे

Alandi Kartiki Wari Preparation: आळंदी शहर सज्ज कार्तिकी वारीसाठी; अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग

नगरपरिषदेची युद्धपातळीवरील तयारी; स्वच्छता, दुरुस्ती व भाविकांसाठी सुविधा अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारीसाठी आळंदी नगरपरिषदेकडून युद्धपातळीवर कामे मार्गी लावली जात असून, विविध ठिकाणची दुरुस्ती कामे अंतिम टप्यात अल्याचे चित्र आहे. कार्तिकीसाठी अतिक्रमण देखील हटविण्याचे काम शहरात वेगात असून, पालिकेकडून देहूफाटा भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. याचबरोबर मरकळ रस्ता, महाद्वार चौक व वडगाव रस्ता भागात कारवाई करण्यात आली.(Latest Pune News)

पालिकेकडून आळंदी शहरातील मुख्य प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसरातील भराव रस्ता, महाव्दार रोड, चावडी रोड, चाकण रोड, नवीन पुल, जुना पुल, मंदिर परिसर व इतर परिसरात अतिक्रमण करून बसलेले पथारीवाले, हातगाडीवाले, खेळणीवाले, पेढेवाले आदींचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

अतिक्रमणाबरोबरच पालिकेने यात्रेच्या दृष्टीने अनुषंगिक कामे मार्गी लावली असून, शहरात महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. पाणी पुरवठ्यासाठी 24 तास जलशुद्धीकरण केंद्रातील पंप सुरू असणार असून, शहरात पालिकेचे व शासनाचे पाण्याचे टँकर उपलब्ध असणार आहेत. शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत पालिका सज्ज असून, सरकारी व खासगी रुग्णालयांना बेड सज्ज ठेवण्यास व आरोग्य सुविधेबाबत सजग राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता राखण्यास सांगण्यात आले असून, मंडप व विद्युत व्यवस्था देखील सज्ज करण्यात येत आहे. यंदाच्या कार्तिकी वारीसाठी येणारी भाविकांची वाढती संख्या पाहता पालिकेने सोयी-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने आपली यंत्रणा कामाला लावली आहे.

येत्या दोन दिवसात आळंदी शहरातील सर्वच भागात अतिक्रमण कारवाई वेगात करण्यात येणार आहे. भाविकांना अडचण होणार नाही याचा विचार करून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेत पालिकेला सहकार्य करावे. भाविकांसाठी आळंदी सज्ज होत आहे. यंदाची वारी निश्चितच सोयी-सुविधापूर्ण, निर्विघ्न आणि स्वच्छतापूर्ण पार पाडू.
माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT