शिवनगर: ‘मी कधीही जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. शासकीय बदल्यांबाबतीत कोणाचा एक रुपया घेतला नाही. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक निवेदनावर मी तातडीनं निर्णय घेतो. मी कामाचा माणूस आहे, मी स्वच्छ आहे, मी कुणाला मिंदा नाही, माझं काम बोलतं,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
माळेगाव कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराज जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. (Latest Pune News)
माळेगाव साखर कारखान्याच्या जवळपास 22 हजार 500 सभासदांच्या कुटुंबांचा हा प्रश्न आहे; म्हणजे एकूण सव्वालाख लोकांशी निगडित माळेगाव कारखाना असल्याने मी स्वतः उमेदवारी जाहीर करून चेअरमन या पदावर दावेदारी केली आहे. जेणेकरून मला अत्यंत काटकसरीने, पारदर्शकपणे आणि बारकाईने कामकाज करता येऊन कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना जास्तीचा ऊसदर देता येईल.
विरोधक माझ्यावर सहकार मोडीत काढायला निघालोय, असा आरोप करतात. परंतु, मी सहकाराचा पुरस्कर्ता आहे. तालुक्यातील दूध संघ, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी संस्था सहकारातील आहेत.
या संस्थांना माझ्या पद्धतीने मी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून संस्था भक्कम आणि बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून हजारो कुटुंबे व त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नका.
माळेगाव कारखान्याच्या मागील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाला विद्यमान संचालक मंडळाने राज्यातील कोणत्याही कारखान्यापेक्षा अधिकचा पहिला हप्ता दिला आहे, तर दोनशे रुपये प्रतिटन कांडे बिल दिले आहे. जर विरोधकांच्या मते कारखाना कर्जबाजारी असता, तर अशा प्रकारच्या ऊसदराचा उच्चांक करता आला असता का? तर अजून फायनल पेमेंट बाकी आहे, ते दिवाळीच्या आसपास देण्याचा मानस आहे, असे पवार यांनी सांगितले.
विरोधक म्हणतात, खासगी साखर कारखान्यांच्या दबावाखाली ममाळेगावफने पहिली उचल 2800 रुपये प्रतिटन कमी दिली. मात्र, साखर पोत्यावरली उचल ज्या प्रमाणात मिळते, त्या प्रमाणातच पैशाची उपलब्धता होते. उगाच ओढूनताणून चुकीच्या पद्धतीने उचल देण्यात काही अर्थ नाही. सगळी सोंगं करता येतात; परंतु पैशाचं सोंग करता येत नाही.
ज्या वेळी पैशाची उपलब्धता झाली. त्या वेळी लगेचच 332 रुपये प्रतिटन दुसरा हप्ता दिला. तर, दोनशे रुपये प्रतिटन कांडेबिल दिले आहे. त्यामुळे राज्यात ममाळेगावफने ऊस राबाबत उच्चांक केला असल्याचे पवार यांनी नमूद केले.
माझा आणि तुमचा संबंध फक्त ममाळेगावफ निवडणुकीपुरता नसून अनेक कामांबाबतीत मी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. सभासद बंधूंनो, कुणाचा पॅनेल निवडून दिल्यानंतर जास्तीचा ऊसदर मिळेल तसेच आपली इतरही कामे होतील, याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा, असे आवाहनही या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
संचालकांचे राजीनामे घेणार
श्री निळकंठेश्वर पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना जे उमेदवार दिले आहेत, त्यांचे मी आत्ताच राजीनामे लिहून घेणार आहे; जेणेकरून संचालक म्हणून ते निवडून आल्यानंतर चुकीचे कामकाज केले, तर त्यांचा राजीनामा घेण्यास सोपे जाईल व ते चुकीचे काम करणार नाहीत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
पाच वर्षे तुम्ही मीटिंगला आला नाही
माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांनी तुम्हाला बहुमताने निवडून दिले होते. असे असताना तुम्ही पाच वर्षे कारखान्याच्या मीटिंगला उपस्थित राहिला नाहीत. तुम्हाला ज्या सभासदबंधूंनी निवडून दिले, त्यांच्या मताचा तुम्ही अपमान केला. त्यामुळे तुम्हाला मत का द्यायचे? असा सवाल करीत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.