प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू- शिष्यांची जोडी या पारंपरिक विरोधक असलेल्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे.
मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा पारंपरिक वाद संपविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली तर काही समेट होऊन दोन्ही विरोधक एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकूण चित्र पाहता माळेगावच्या निवडणुकीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असल्याचे दिसत आहे. अशावेळी किती पॅनल होणार? कुणाचे होणार? याबाबत सभासदांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (Latest Pune News)
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 12 मे पर्यंत आहे. सहकारमहर्षी चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू- शिष्यांच्या संभाव्य उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचाराचा धडाका लावला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा घेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अद्यापपर्यंत गावोगावी जाऊन प्रचारास सुरुवात केली नसल्याचे चित्र आहे.
सांगवी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांनी सत्ताधार्यांकडून समेटासाठी प्रयत्न झाल्याचे सांगितले, तर रंजन तावरे यांनी विरोधकांवर सडकून टीका करत सत्ताधार्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावर उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्व गोष्टींचा खुलासा करत सत्ताधारी संचालक मंडळाने चांगले काम केल्याची भूमिका स्पष्ट केली.
विरोधकांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण करत दुसरी सुरू केली तरी, सत्ताधार्यांनी अद्याप प्रचारास सुरुवात केली नसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या निवडणुकीसाठी तडजोड करण्याची भूमिका घेतील, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा घेत सभासदांमध्ये जाऊन भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत, तर कष्टकरी शेतकरी समितीने यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे.
केंद्र, राज्याची मदत घेण्यासाठी ऐक्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांना बरोबर घेत कारखाना पूर्वपदावर आणण्याची भूमिका घेतली आहे, त्याच धर्तीवर माळेगावच्या निवडणुकीत अजित पवार हे विरोधकांना एकत्र घेत केंद्र तसेच राज्य शासनाच्या मदतीने कारखान्याला सर्वतोपरी मदत करतील, असा देखील मतप्रवाह असल्याचे दिसते.
...तर समेट होऊ शकतो
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी युतीधर्म पाळत चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी अजित पवारांच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे कारखाना निवडणुकीत तडजोडीबाबत चंद्रराव तावरे अनुकूल नाहीत, तथापि पुन्हा जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष घालून निर्णायक भूमिका बजावली तर मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समेट घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.