बारामती : जोपर्यंत माझे हात-पाय चालतील, तोपर्यंत मी तुमच्या भल्यासाठी काम करत राहीन. मी कामाचा माणूस आहे, मी काम करून दाखवतो, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण बुधवारी (दि. २८) दिवसभर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
बारामतीत दादांचा वादा हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी नेहमी असायचे. राष्ट्रवादीच्या प्रचार सभांमध्ये हे गीत सगळीकडे वाजायचे. जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निमित्ताने बुधवारी बारामती तालुक्यात त्यांच्या चार सभा आयोजित केल्या होत्या. या सभेत ते काय बोलतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले होते.
वक्तशीरपणा जपणाऱ्या पवार यांची सकाळी ९.३० वाजता निरावागजला पहिली सभा होती. त्यासाठी ते ९ वाजेपर्यंत बारामतीत पोहोचावे या बेताने आले होते. परंतु विमान लॅंडींगसाठी काही क्षणांचा अवधी असताना अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले.
पवार यांची भाषणे नेहमीच गाजायची. ती बारामतीतील असो की राज्यातील. त्यांच्या भाषणाच्या चर्चा व्हायच्या. विमान अपघातानंतरचे व्हिडिओ, फोटोज सोबत जोडत लाखो व्हिडिओ बुधवारी तयार केले गेले. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. स्टेट्स आणि पोस्टने संपूर्ण सोशल मीडिया अजितदादांनी व्यापून टाकल्याचे दिसून आले.