Ajit Pawar Daund party meeting
खोर: दौंड तालुक्यात संघटनात्मक काम वाढवून पक्ष बळकट करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माजी आमदार रमेश थोरात यांनी शुक्रवारी (दि. 1) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा राजीनामा देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वरवंड येथे आयोजित या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी झालेल्या सभेत पवार बोलत होते. या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पक्षाचे नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, रिंगरोड, रेल्वेलाइन, पुरंदर विमानतळ, वंदे भारत, लोकल सेवा यासाठी काम सुरू केले आहे. लवकरच दौंडजवळ भव्य शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. (Latest Pune News)
नव्या नेतृत्वाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी दिली जाणार आहे. मागील अपयशाने खचून न जाता पुढे वाटचाल करा, असा सल्ला पवार यांनी दिला.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, रमेश थोरात यांच्या पुनरागमनामुळे दौंड तालुक्याला नवसंजीवनी मिळाली आहे. अजित पवार हे तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय देणारे नेते आहेत. मी हाडाचा शेतकरी असल्यानेच कृषी खात्याची जबाबदारी मिळाली असून, ती इमानेइतबारे पार पाडणार आहे.
माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, मागील काही महिने मी भलते वळण घेतले होते. मात्र, गेल्या 35 वर्षांपासून मी अजित पवार यांच्यासोबत आहे, हे सार्या महाराष्ट्राला माहिती आहे. अधिकारीवर्गाने जनतेवर अन्याय करून चालणार नाही. दौंड तालुक्यातील कामे प्राधान्याने पूर्ण झाली पाहिजेत. शेतकर्यांना कांदा, दुधाचे योग्य दर मिळावेत. तालुक्याचा ठाम पाठिंबा अजित पवार यांना असून, कृषिमंत्री भरणे यांनीही शेतकर्यांसाठी कार्यरत करावे, अशी अपेक्षा रमेश थोरात यांनी व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सुरेश घुले, वैशाली नागवडे, अण्णासाहेब महाडिक, वीरधवल जगदाळे, तुषार थोरात, नितीन दोरगे, सायली दळवी आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब कापरे यांनी केले. सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले. राहुल दिवेकर यांनी आभार मानले.
चौफुल्याकडे कोण येते ते पाहा?
राजकारणात कॅमेर्यावर लक्ष ठेवा, चौफुल्याकडे कोण येते ते पाहा? अशी मिश्किल टिप्पणी या वेळी अजित पवार यांनी केली.