बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जसे कठोर निर्णयांसाठी ओळखले जायचे, तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र ते तितकेच कौटुंबिक, संवेदनशील आणि प्रेमळ पती असल्याचे बारामतीकरांनी नेहमीच अनुभवले. त्यांच्या राजकीय जीवनातील अनेक कठीण प्रसंगांत पत्नी सुनेत्रा यांनी त्यांना खंबीर साथ दिली. या दोघांचा तब्बल 37 वर्षांचा संसार आजच्या पिढीसाठी नात्यांचे मोल शिकवणारा ठरला. सुखी संसारातील एकाची साथ मात्र अखेर बुधवारी (दि. 28) सुटली.
ज्येष्ठ नेते शरद पवार, तत्कालीन मंत्री पद्मसिंह पाटील या दोघांच्या मैत्रीतून अजित पवार व सुनेत्रा यांचा विवाह ठरला. खरे तर हे अरेंज मॅरेज. प्रेमाचा गोड प्रवास असा संसार दोघांनी केला; मात्र विमान अपघात झाल्याने अजित पवार यांचे निधन झाले आणि या सुखी संसाराला दृष्ट लागली. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा विवाह 1985 मध्ये अरेंज मॅरेज पद्धतीने झाला. लग्नानंतर हळूहळू वाढत गेलेले प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर आदर, यामुळे हे नाते आजही भक्कमपणे उभे राहिले होते. राजकारणातील व्यस्तता, संघर्ष, टीका-आक्षेप यांचा कधीही संसारावर परिणाम होऊ दिला नसल्याने हेच त्यांच्या नात्याचे मोठे वैशिष्ट्य ठरले.
राजकीय चढ-उतार असोत किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या, सुनेत्रा पवार यांनी कायम अजितदादांच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले. नुकत्याच एका कार्यक्रमात विचारलेल्या “अजितदादा तुमच्यासाठी कधी ‘नॉटरिचेबल’ असतात का?” या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर लक्षवेधी ठरले, “ते कितीही कामात असले तरी माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी कधीच नॉटरिचेबल नसतात.” यातून त्यांच्या नात्यातील विश्वास आणि जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येतो.
राज्याच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावत असतानाही कुटुंबासाठी वेळ काढणे, ही अजित पवार यांची खासियत असल्याचे सुनेत्रा पवार आवर्जून सांगत असायच्या. हे दोघे जाहीर कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्यानंतर अजित पवार हे नेहमीच भाषणात विनोद करायचे. खा. सुनेत्रा यांना खासदार केल्यानंतर पवार कुटुंबात दोन खासदार झाल्याचेही अजित पवार म्हणाले होते. कामाच्या व्यापात देखील घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता कुटुंबासोबत वेळ घालवणे त्यांना महत्त्वाचे वाटते, हीच बाब त्यांच्या संसाराला बळ देणारी ठरली. संसार म्हटले की प्रेमाबरोबर थोडीशी नाराजीही असतेच.
अजितदादा वेळेवर जेवत नाहीत, कामात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ही सुनेत्रा पवार यांची एकमेव प्रेमळ तक्रार होती. राजकारणामुळे वेळ कमी मिळत असला तरी, जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा कुटुंबासोबत फिरणे, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे अजितदादांना आवडत असायचे. पण, या दोघांच्या संसाराला बुधवारी दृष्ट लागली. एक चाक निखळले गेले.