Ajit Pawar Pudhari
पुणे

Pune Ajit Pawar Statue: पुणे जिल्हा परिषदेत अजितदादांचा स्मृतिठेवा; पुतळ्याचे अमित शहांच्या हस्ते अनावरण

छायाचित्र दालन, कॉफी टेबल बुक आणि जीवनकार्यावरील लघुपटाचेही प्रकाशन; अजित पवार यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्ह्याच्या राजकारणासह ग्रामीण विकासाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी (दि. १६) त्याचे अनावरण होणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे विशेष छायाचित्र दालन, कॉफी टेबल बुक आणि जीवनकार्यावर आधारित लघुपटाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.

अजित पवार यांचे पुणे जिल्हा परिषदेशी गेल्या अडीच ते तीन दशकांपासून घनिष्ठ संबंध होते. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजात विशेष लक्ष घातले होते. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, प्रशासकीय इमारती, विकासकामांसाठी निधी आणि पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची इमारत तसेच जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या इमारतींच्या उभारणीत त्यांचे योगदान राहिले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीपासून विकासकामांच्या नियोजनापर्यंत त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाला विशेष महत्त्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत अनेक आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्यांना काम करण्याची संधी मिळाली.

अजित पवार यांच्या निधनानंतर १२ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात सर्वपक्षीय आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्यांनी एकत्र येत श्रद्धांजली सभा घेतली होती. यावेळी अनेकांनी अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा देत जिल्हा परिषदेच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला होता.

त्यांच्या स्मरणार्थ विशेष पुस्तक प्रकाशित करणे आणि विविध योजनांना त्यांचे नाव देण्याबाबतही चर्चा झाली होती. आता जिल्हा परिषद मुख्यालयातील पुतळा, छायाचित्र दालन, कॉफी टेबल बुक आणि लघुपटाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT