बारामती | पुढारी वृत्तसेवा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात असून २२ जूनला मतदान होणार आहे. २४ जूनला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या नीलकंठेश्वर पॅनलचे कार्यकर्ते सोमवारी गोविंद बागेत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले.
या कार्यकर्त्यांनी सुळे यांच्याकडे पाठिंबा मागितला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट विचारले, “तुमचा अजेंडा काय आहे? मी तुम्हाला मतदान का करावे?”
यानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन मतदानासाठी विनंती केली. विशेष म्हणजे, त्याच वेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनल’च्या उमेदवारांशी संवाद साधत होते.
या अनपेक्षित भेटीत सौजन्यपूर्ण राजकीय संवाद घडला. सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी नम्रपणे संवाद साधत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.
या घडामोडींमुळे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय रंगत वाढली असून, दोन्ही गटांच्या हालचालींवर राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.