युवराज खोमणे
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील निंबूत-कांबळेश्वर या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण गटात उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला कोणाला संधी देतात? याकडे लक्ष लागले आहे. या गटात राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. (Latest Pune News)
हा गट सर्वसाधारण आहे, त्याबरोबर निंबूत गण देखील सर्वसाधारण आहे. कांबळेश्वर गण मात्र नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सर्वसाधारण आरक्षण असल्याने इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. अनेक तरुण राष्ट्रवादीकडे उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. अजित पवार या गटात भाकरी फिरविण्याच्या तयारीत आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी मिळते का याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. अनेक जण इच्छुक असल्याचे सांगत आहेत; मात्र पवार जो उमेदवार देतील तोच निवडून येणार हे स्पष्ट आहे. नव्या दमाच्या तरुणांना संधी देण्याची मागणी मतदार करत आहेत.
निंबूत गणामध्ये गडदरवाडी, खंडोबाचीवाडी, निंबूत, वाघळवाडी, वाणेवाडी आणि मुरूम या गावांचा समावेश आहे. कांबळेश्वर या गणामध्ये करंजेपूल, सोरटेवाडी, सस्तेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, कोराळे खुर्द, लाटे, माळेवाडी लाटे, शिरष्णे आणि कांबळेश्वर या गावांचा समावेश आहे. या गटामध्ये सातत्याने निंबूत, वाणेवाडी, खंडोबाचीवाडी या गावांनाच संधी मिळाली आहे. अन्य गावांना यंदा संधी मिळणार का? असा
प्रश्न तरुणांकडून उपस्थित होत आहे.
भाजप आणि दोन्ही शिवसेना या पक्षाचे या गटात फारसे अस्तित्व नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा एक मोठा गट येथे सक्रीय आहे. तो काय भूमिका घेतो, हे अद्याप स्पष्ट नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादी काँग््रेासकडे इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातून काही तरुण बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे या जिल्हा परिषद गटात फारसे अस्तित्व नाही. निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून सोमेश्वर येथील चौका-चौकात इच्छुक उमेदवार मतदारांचा अंदाज घेत आहेत. इच्छुक उमेदवाराकडून मतदारांशी संवाद सुरू करण्यात आला आहे.
तरुणांना मिळणार संधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरुणांना संधी देणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडे तरुणांची सर्वाधिक संख्या राहणार आहे. आगामी निवडणुकांचे राजकारण पाहता नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. उच्चशिक्षित, तरुण आणि नव्या चेहऱ्याला संधी देण्याची गरज मतदार व्यक्त करत आहेत.
जि. प. सभापती अन् पं. स. सभापतीपदाची मिळाली होती संधी
गत निवडणुकीनंतर प्रमोद काकडे यांना जिल्हा परिषद सभापतीपदाची संधी मिळाली. त्यांच्या काळात गटात अनेक विकासकामे झाली. मागील वेळी करंजेपूल गणातून मेनका मगर तर निंबूत गणातून नीता फरांदे यांना संधी मिळाली. पुढे फरांदे यांनी सभापतीपद भूषविले आहे.