बारामती : बारामतीतील विकासकामांतील साहित्याची अनेकदा चोरी होत आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीही अशा मंडळींना फटकारले होते. शुक्रवारी (दि. 17) बारामतीत एका कार्यक्रमात त्यांनी अशा चोऱ्या करणाऱ्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून माझ्याकडे आणून द्या. जो ते मला आणून देईल, त्याला मी ‘एक लाख’ रुपयाचे बक्षीस देतो आणि जो सापडेल त्याला दोन लाख दंड करतो, असे आवाहन बारामतीकरांना केले. अशा चोरट्यांकडील दोन लाखाच्या दंडातील एक लाख तुम्हाला आणि एक लाख नगरपरिषदेला देत त्यातून शहर आणखी स्वच्छ करू, असेही ते म्हणाले.(Latest Pune News)
बारामतीतील एका भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शहरातील विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर पवार यांनी शहर स्वच्छतेवर भाष्य केले. शहर स्वच्छ ठेवा, निरा डावा कालवा स्वच्छ ठेवा. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली पाहिजे. आपल्याकडे त्यासाठी सगळ्या सुविधा आहेत. परंतु, अनेक ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडत आहेत. बारामतीत मी एवढा मोठा चांगला बिज केला, तिथे काही जण चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोखंडी ॲगल पायरी खराब होऊ नये म्हणून लावले आहेत, तेच तोडून नेले जात आहेत. पट्या चोरून विकल्या जात आहेत. त्यातून एखाद्या वेळी बिजवर काही घटना घडली तर पुन्हा लोक म्हणणार यांनी कशा पद्धतीने विकास केला? असे पवार म्हणाले.
शहरात असे प्रकार कोणी करत असेल तर नकळत मोबाईलमध्ये चित्रीकरण करा, ते मला आणून द्या, लाख रुपये बक्षीस देतो, असे आवाहन पवार यांनी केले.
शहरात मुलांना खेळण्यासाठी साधने उपलब्ध केली. खेळण्याच्या ठिकाणी त्यांना जखमा होऊ नयेत यासाठी समुद्रातील वाळू आणून टाकली. तिथे वृद्धांना बसायला जागा केली. काही शहाण्यांनी तिथली वाळूच रात्रीला पिशवीत भरून चोरून नेली. ही असली जित्राबं माझ्या बारामतीत का आहेत? असा प्रश्न मला पडला आहे. यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. मी काही चांगले केलेय तेथे गोधड्या आणून वाळत घातल्या जात आहेत, अरे तुझ्या घरात काय टाकायचे ते टाक ना. मी जे चांगले केले तेथे का टाकतो? असा सवाल पवार यांनी केला.