पुणे : दिवाळीत फक्त हिंदूच्या दुकानातून खरेदी करा, असे सांगणाऱ्या अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना यापूर्वी समज देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सुधारणा करतो, असा शब्द दिला होता. मात्र, त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. ते वारंवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय-धोरणाविरोधात भूमिका घेत आहेत, त्यामुळे पक्ष त्यांना नोटीस देणार आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार दिली.
नवले लॉन्समध्ये शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. संग्राम जगताप यांनी दिवाळीत हिंदूकडूनच खरेदी करावी, असे वक्तव्य केल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका व ध्येय-धोरण हे सर्व धर्म समभावाचे आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाण्याचे आहे. अरुणकाका जगताप असताना सर्व काही सुरळीत सुरू होते. ते गेल्यावर मात्र, संग्राम जगताप यांच्या डोक्यावरील वडिलांचे क्षेत्र गेले. त्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका मांडण्यास सुरूवात केली. त्यांना यापूर्वी मी समज दिली होती. त्यांनी सुधारणा करतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही. त्यांनी मुस्लिम बांधवांबद्दल असे बोलणे योग्य नाही. ते पक्षाच्या ध्येय-धोरणाविरोधात बोलत असल्याने त्यांना लवकरच नोटीस दिली जाणार आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा काढण्यात आला आहे. त्याबाबत विचारले असता, पवार यांनी यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता आत्मपरीक्षण करावे, असे म्हटले आहे.
पवार म्हणाले, कोणत्याही आपत्तीच्या वेळी सरकार पाहणी करून, पंचनामे करून माहिती संकलित करते व त्यानुसार मदत करते. मात्र, जाहीर केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्ष करत असतात. सरकारची मदत तुटपुंजी आहे, अशी टीका करतात. मागणी करणे, टीका करणे विरोधकांचे कामच असते. मात्र, सरकारच्या विरोधात हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना काय काम केले, याचे आत्मपरीक्षण करावे.
राज्य सरकारने पूरग्रस्तांना व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांंना पैशाची व धान्याची मदत दिली आहे. जाहीर केलेल्या साडेतीनशे कोटीच्या पॅकेजचे पैसै दिवाळीपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मदतीसाठी केंद्राला पाठविलेल्या प्रस्तावात बदल करता येत नाही. त्यामुळे शेतीचे पंचनामे, रस्ते व पुलांचे नुकसान आदींची सर्व माहिती घेऊन त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत पवार म्हणाले, पाटील यांनी काय वक्तव्य केले मला माहिती नाही. ते बोलले असतील तर बळीराजाबद्दल असे बोलणे योग्य नाही. भेटल्यानंतर त्यांना मी योग्य त्या सूचना करीन. पुरंदर विमानतळाच्या प्रश्नावर पवार म्हणाले, तेथील जमिनीचे भाव वाढले, त्याला आम्ही काही करू शकत नाही. लॉजिस्टिकसह आम्हाला विमानतळासाठी सहा हजार एकर जमीन लागणार होती. मात्र, निधीमुळे दोन धावपट्ट्यांसाठी तीन हजार एकर जमिनीची गरज आहे, त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे.
स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात वेगवेगळी परिस्थिती असते. यापूर्वी आम्ही या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य स्थानिक नेतेमंडळींना दिले होते. त्याच पद्धतीने या वेळीही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे नेते म्हणून मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय घेऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही कायम बेरजेचे राजकारण करतो, त्यामुळे ज्यांची प्रतिमा चांगली आहे. ज्यांच्यावर दोन नंबरचे गुन्हे दाखल नाहीत, अशांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.
माजी आमदार रवींद्र धंगेकर हे नीलेश घायवळ प्रकरणावरून भाजप नेत्यांवर टीका करत असल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, रवींद्र धंगेकर हे अजूनही आपण कॉंग्रेसमध्येच आहोत असे समजत आहेत. त्यांनी पक्षांतर केले आहे, याचे भान त्यांना नाही. ते विसरले आहेत. ते आता शिवसेनेत आहेत. त्यांचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांनी युतीचे धर्म व युतीची नियमावली, याचे पालन करणे गरजेचे आहे. मित्रपक्षाचे भान सर्वांनीच ठेवणे गरजेचे असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले.