

पुणे : पत्नीच्या काही वर्तनामुळे पतीस वेदना किंवा निराशेची भावना झाली असेल. मात्र, ही क्रुरता इतकी नाही की, जोडीदाराशी वैवाहिक संबंध ठेवणे असुरक्षित वाटेल, असा निष्कर्ष काढत कौटुंबिक न्यायालयाने पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज फेटाळला. याबरोबरच तीन महिन्याच्या आत वैवाहिक नातेसंबंध पुर्नस्थापित करण्याचा आदेशही पतीला दिला आहे. त्यामुळे पतीच्या घरातच राहणाऱ्या पत्नीला दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश गणेश घुले यांनी हा आदेश दिला.
जय (वय ४५) आणि ललिता (वय ४०) (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. २००९ मध्ये दोघांचा विवाह झाला. तो व्यावसायिक आहे. तर ती गृहिणी आहे. पत्नीच्या कृत्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे सांगत २०१६ मध्ये पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यामध्ये पत्नीने पोटगी आणि स्वत:च्या घरात नांदण्यास परवानगी देण्याची मागणी न्यायालयात केली. पत्नी व दत्तक मुलासाठी दरमहा ५० हजार रुपये पोटगीचा आदेश न्यायालयाने दिला. यादरम्यान, न्यायालयाने क्रूरतेच्या आधारावर पत्नीपासून घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यास पत्नीच्यावतीने विरोध करण्यात आला. तिघेही पतीच्या घरात एकत्र राहत आहेत.
पत्नी व मुलाच्या अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सेवा आणि मुलाच्या शिक्षणाची काळजी पतीच घेत आहे. पतीकडून क्रुर वागणूक मिळाल्याचे पत्नीने कधीही म्हटले नाही. तसेच, कौटुंबिक हिंसाचार केल्याचे ठोस पुरावे दिले नसल्याचे सांगत पतीची घटस्फोटाची मागणी फेटाळण्याची विनंती पत्नीच्या वतीने न्यायालयाला केली. यावर न्यायालयाने पत्नी काही प्रमाणात क्रुर वागली तरीही, पती-पत्नी एकत्र मुलाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. पती व नातेवाईक सर्व सुख आणि दु:खात सहभगी होतात, असा निष्कर्ष काढत वरील आदेश दिला.