पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री पद पुन्हा स्वीकारल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी (दि.13) विविध विभागांच्या बैठका बोलविल्या आहेत. विशेषत: ससून रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्य विभागाची झाडाझडती घेण्याची शक्यता असून, महावितरण, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, क्रीडा विद्यापीठ याबाबतही ते अधिकार्यांशी चर्चा करणार आहेत. पवार कोरोना साथीच्या काळात पुण्याचे पालकमंत्री होते, तेव्हा आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी पुण्याचा आढावा घेत असत. आताही त्यांनी त्याच पद्धतीने कामांना सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. त्या कामांची सद्यस्थिती, कामांसाठी आलेले अडथळे आणि कामांबाबत जिल्ह्यातून आलेल्या तक्रारींविषयी पवार जलजीवन मिशन अभियानाचा आढावा घेणार आहेत. पीएमआरडीएच्या प्रकल्पाचेदेखील सादरीकरण केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीबाबतचीदेखील आढावा बैठक होणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम, पुरातत्व विभाग, चाकण नगरपरिषद विकास आराखडा आणि कात्रज दूध संघाची पवार आढावा घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा