Malegaon Sugar Factory Election
शिवनगर : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या भल्यासाठी माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदी अजित पवारच असेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेत केली. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभासाठी अनुषंगाने शनिवारी (दि.१४) पाहुणेवाडी (ता.बारामती) येथील सभेत पवार बोलत होते.
मी सहकाराला बळकटी देणारा माणूस आहे तालुक्यातील ज्या सहकारी संस्था आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात हे सर्व तुम्ही पाहत आहातच परंतु विरोधक सातत्याने मी सहकार बुडवायला निघालो आहे अशा वल्गना करून सभासदांची दिशाभूल करत आहेत. माळेगावचं भलं फक्त अजित पवारच करू शकतो माझ्या अंगी ती धमक आहे लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं माझं नेतृत्व आहे,असेही अजित पवार यांनी सांगितले.
काही लोकांचं वय झालं तर त्यांनाच चेअरमन व्हावसं वाटतं पण मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो जे लोक पाच वर्षात कारखाना संचालक मंडळाच्या मिटींगला उपस्थित राहिले नाहीत अशा लोकांनी सभासदांचा हिताचा दावा करणे म्हणजे हास्यास्पद आहे. तर त्यांना खरंच सभासदांची चिड असती तर त्यांनी वेळोवेळी चुका होत असतील तर त्या सांगितल्या असत्या परंतु त्यांना सभासदांचे काही घेणं देणं नाही फक्त चुकीच्या भूलथापा करायच्या अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता विरोधकांवर सडकून टीका केली.
यावेळी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष ॲड केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे आदींसह बहुसंख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते.