पुणे: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत या वेळी प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बलाढ्य विरोधकांशी सामना होईल. अजित पवारांचे पारंपरिक विरोधक तावरे गुरू-शिष्यांना या वेळेला राज्यपातळीवरून भाजप नेते आणि थेट मुख्यमंत्र्यांकडूनच बळ मिळण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीत अजित पवार यांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी अजित पवार बारामतीतील निवडणुकीमध्ये राज्यपातळीवरील आपल्या नेतृत्वाचा आणि दबदब्याचा वापर सर्रास करीत होते, या वेळेला त्यांना तसे करता येईल का नाही, याबाबत मोठी शंका आहे. अजित पवार यांचे नेहमीचे दबावतंत्र या वेळेला बोथट होण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
ज्येष्ठ नेते सहकारमहर्षी चंद्रराव तावरे आणि त्यांचे शिष्य रंजनकुमार तावरे हे बर्याच काळापासून भाजपचे काम करीत आहेत. भाजपचे बारामतीतील किंबहुना बारामती लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत पाईक, अशी या दोघांची ओळख आहे. माळेगाव कारखान्याच्या परिसरातही या जोडगोळीचा चांगला प्रभाव आहे, या दोघांनी कारखान्याचा कारभार चांगला चालवला होता.
या गुरूःशिष्यांच्या प्रभावाचा वापर करण्यासाठी त्यांना ताकद देऊन माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार यांना धक्का देण्याची संधी जर मिळत असेल तर ती का घेऊ नये? असा विचार करून भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि राज्यातील अजित पवार यांचे विरोधक हे तावरे गुरू-शिष्यांना मोठे बळ देण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर अजित दादाही इरेला पेटले असून ते स्वतः संचालक पदासाठी उभे राहिले आहेत. मी ही निवडणुक वेगळ्या पध्दतीने लढणार आहे, तुम्ही काय काळजी करू नका असे त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये घोषित केलेले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका ही अजून ठरलेली नाही. शरद पवारांचाही या भागामध्ये सर्व दूर चांगलाच परिचय आहे. शरद पवारांचा कारखाना म्हणूनच हा कारखाना ओळखला जातो त्यामुळे शरद पवार आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो यावर ही अजित पवार यांचे गणित बिघडू शकते अशी राजकीय स्थिती आहे. अजित पवारांना यावेळी प्रथमच माळेगावच्या लढाईत बलाढ्य ताकतींना सामोरे जावे लागणार आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार काय धोरणे असतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.